मुंबई – रिचा चढ्ढा सध्या आपल्या आगामी टीव्ही शो च्या तयारीमध्ये व्यस्त आहे. हा शो क्रिकेटवरच अवलंबून आहे. त्यामुळे रिचाला आपले क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. पूर्वीही ती तासन्तास क्रिकेटच्या मॅच बघत बसायची.
त्याचे कारण केवळ क्रिकेटवरचे प्रेम हेच नव्हते. तर आणखीन एक कारणही होते. अगदी तरुणपणी तर क्रिकेट तिला फारसे कळतही नव्हते. मात्र, राहुल द्रविड फार आवडायचा. राहुल द्रविड लयबद्धरीतीने खेळायला लागायचा, तेव्हा रिचा टीव्हीला खिळून राहायची.
“राहुल द्रविडचे माझे खरे आणि पहिले प्रेम होते.’ असे रिचाने सांगितले. आता निवृत्तीनंतर राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पुन्हा एकदा दिसायला लागला आहे. त्यामुळे रिचा खूप खूश झाली आहे.
आता ती पुन्हा एकदा क्रिकेटचे सामने बघायला सुरुवात करणार आहे. आपल्या वेबशोव्यतिरिक्त रिचा चढ्ढा आपल्या प्रोडक्शनच्या कामातही व्यस्त आहे. अली फैजलबरोबर तिने यावर्षीच्या सुरुवातीलाच एक प्रॉडक्शन कंपनी सुरू केली आहे.
या प्रॉडक्शनच्या एका सिनेमाचे प्रॉडक्शन सुरू आहे. रिचा चढ्ढाचे दोन सिनेमे यावर्षी रिलीज झाले आहेत. आता आपल्या वेबसिरीजमध्येही ती बिझी असणार आहे.