प्रशिक्षकपदाची ऑफर द्रविडनेच नाकारली – राय

नवी दिल्ली – माजी कर्णधार राहुल द्रविडला भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची संधी होती. मात्र, परिवाराला वेळ द्यायचा असल्याचे कारण देत खुद्द द्रविडनेच ही ऑफर नाकारली, असा खुलासा बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी केला आहे.

2017 साली झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेचे विजेतेपद पाकिस्तानने पटकावले होते. त्यावेळी कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात मतभेद असल्याचे प्रथमच चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घटनांनंतर कुंबळे याने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

मुलाखती, सादरीकरण अशा प्रक्रिया घेत बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु केला होता. त्यावेळी द्रविड हाच पहिली पसंती होता, तसा त्याला प्रस्तावही देण्यात आला होता. मात्र, कारकिर्दीत सातत्याने खेळावे लागल्याने परिवाराला वेळच देता आलेला नाही, त्यामुळे आता त्यांच्यासाठी वेळ द्यायचा आहे असे सांगत द्रविडनेच हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यानंतर कोहलीच्या विनंतीमुळे शास्त्री यांना नियुक्त करण्यात आले, असे राय यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.