आक्रमक फलंदाजीसाठीही द्रविडचाच सल्ला

चेतेश्‍वर पुजाराने केला गौप्यस्फोट

मुंबई -कसोटी स्पेशालिस्ट असा शिक्‍का बसलेला भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्‍वर पुजाराने एक गौप्यस्फोट केला आहे. कसोटीसाठी संयमी फलंदाजी करण्यासाठी राहुल द्रविडचा सल्ला फायदेशीर ठरला होता, तसाच टी-20 क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी करणे कसे आवश्‍यक असते हा द्रविडनेच दिलेला सल्ला उपयोगी ठरल्याचे पुजाराने सांगितले आहे.

पुजाराचा संघनिवडीदरम्यान विचार केवळ कसोटी सामन्यांसाठीच केला जात होता. मात्र, यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याला महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या संघात घेत चाहत्यांना आनंदचा धक्‍का दिला. त्याचबरोबर सराव सत्रात पुजाराने आक्रमक फलंदाजी करत सगळ्यांनाच कोड्यात टाकले. फलंदाजीच्या शैलीतील हा बदल अचानक कसा झाला असे प्रश्‍नही त्यामुळे निर्माण झाले.

मात्र, या सगळ्यावर पुजाराने दिलेले उत्तर ऐकून अनेकांना सुरुवातीला विश्‍वासही बसला नाही. यंदाच्या आयपीएल स्पर्धेद्वारे पुजाराने तब्बल सात वर्षानंतर पुनरागमन केले आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने 50 लाखांच्या बेस प्राईजवर खरेदी केले. टी-20 क्रिकेटमधील पुनरागमन करण्याचे श्रेय पुजाराने द्रविडला दिले आहे.

टी- 20 क्रिकेट केळल्यामुळे कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीवर विपरित परीणाम होईल, अशी मला भीती वाटत होती. त्यामुळेच मी क्रिकेटच्या या प्रकारापासून लांब होतो. मात्र, सामना कोणताही असे परिस्थितीनुसार फलंदाजीत बदल करावाच लागतो.

एखाद्या कसोटी सामन्यात विजयासाठी आवश्‍यक धावा मर्यादित वेळेत करायच्या असतील तर संयमी फलंदाजीचा बाज विसरूनच फलंदाजी करावी लागते. मग पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करण्याची शैली विकसित केलीस तर टी-20 क्रिकेटमध्येही यशस्वी होशील व कसोटी क्रिकेटचा बाजही बाजूला पडणार नाही. ज्या प्रकारचा सामना असेल त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील फलंदाजाला खेळता आलेच पाहिजे हा द्रविडने दिलेला सल्ला मला पटला, असे पुजाराने सागितले.

सामना कोणत्याही प्रकारचा असो नेहमी नैसर्गिक खेळ करण्यावर भर दिला गेला पाहीजे. तू नैसर्गिक खेळ कर मात्र, ते करताना नवनवे फटके मारण्याचाही सराव केला पाहीजे. टी-20 क्रिकेटमधील काही बदल कसोटीतही उपयोगी ठरू शकतात. द्रविडने दिलेल्या या सल्ल्यामुळेच माझा दृष्टिकोन बदलला, असेही पुजारा म्हणाला.

पुजारा भारताकडून आजवर एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेला नाही. तो 2014 साली झालेल्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. त्यानंतर आत्ता तो स्पर्धेत पुनरागमन करत आहे. त्यापूर्वीही तो कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुकडून खेळला आहे.

पुजाराने आयपीएलमध्ये एकूण 30 सामने खेळताना 390 धावा केल्या आहेत. पुजाराने देशांतर्गत टी-20 क्रिकेटमध्ये सौराष्ट्रकडून 2019 साली रेल्वेविरुद्ध शतकी खेळीही केली आहे. आता यंदाच्या स्पर्धेत तो चेन्नई संघाकडून कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आक्रमक रूप दिसणार
एखादा फलंदाज जरी तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जात असला तरीही तो देखील आक्रमक फलंदाजी करू शकतो हेच पुजाराने सराव सत्रात दाखवून दिले आहे. त्यामुळे कदाचीत मुळातच आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले फलंदाज जरी अपयशी ठरले तरी पुजारासारखे संयमी फलंदाज केव्हाही स्फोटक खेळी करू शकतात. हेच आता यंदाच्या स्पर्धेत लक्षवेधी ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.