कोलकता – पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांच्यावरून राज्य आणि केंद्र सरकारांमध्ये सुरू झालेल्या संघर्षाला सोमवारी नाट्यमय वळण लागले. बंडोपाध्याय यांनी थेट सेवानिवृत्तीचा निर्णय घेतला. आता ते पुढील तीन वर्षांसाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुख्य सल्लागाराच्या भूमिकेत दिसतील.
यास चक्रीवादळाने तडाखा दिलेल्या बंगालचा दौरा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आढावा बैठकीला ममता आणि बंडोपाध्याय उपस्थित राहिले नाहीत.
त्यावरून वादंग निर्माण होऊन ममता आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बंडोपाध्याय यांना पुन्हा केंद्रीय सेवेत बोलावून घेतले. मात्र, ममतांनी त्याला विरोध दर्शवला.
त्यामुळे पुढे काय घडणार याविषयी उत्सुकता बळावली असतानाच स्व:त ममता यांनी बंडोपाध्याय यांच्या निवृत्तीची आणि नव्या जबाबदारीची माहिती दिली. बंडोपाध्याय यांच्या जागी एच.के.द्विवेदी यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बंडोपाध्याय हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) बंगाल केडरचे अधिकारी आहेत. वयाची साठी पूर्ण होत असल्याने ते सोमवारीच सेवानिवृत्त होणार होते. मात्र, करोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले.
त्यामुळे बंगालच्या विनंतीवरून बंडोपाध्याय यांच्या सेवेला केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. तो वाढीव कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी त्यांना पुन्हा केंद्रीय सेवेत बोलावण्यात आले होते.