सौंदर्य स्पर्धेत ‘हायव्होल्टेज ड्रामा’; घटस्फोटीत असल्याने विजेतीचा मुकुट काढला अन्…

कोलंबो – मिसेस श्रीलंका सौंदर्यवती स्पर्धेदरम्यान लाइव्ह कार्यक्रमातच एक धक्कादायक घटना घडली. या स्पर्धेच्या गतविजेतीने सगळ्यांसमोर स्पर्धेच्या यंदाच्या विजेतीच्या डोक्‍यावरचा ताज काढून रनरअपला घातला. विजेती पुष्पिका डिसिल्वा घटस्फोटीत असल्याचा दावा करत हे कृत्य करण्यात आले. मात्र डोक्‍यावरून हा ताज उतरवताना विजेती पुष्पिका डिसिल्व्हाच्या डोक्‍याला दुखापत झाली यानंतर तिला रुग्णालयात न्यावे लागले. रविवारी लाईव्ह शो सुरू असताना मंचावर घडलेल्या या घटनेने साऱ्यांनाच हैराण केले.

खरंतर, पुष्पिका डिसिल्वाला मिसेस श्रीलंका या किताबाने गौरवण्यात आले. या घोषणेनंतर मंचावर तिला रनरअपसोबत विजेतीचा ताज घालण्यात आला. यानंतर गतविजेती कॅरोलिन जूरी मंचावर आली आणि तिने डिसिल्वाच्या डोक्‍यावरून ताज काढून गेतला. जूरीने सांगितले की डिसिल्वा घटस्फोटित महिला आहे. तिला या स्पर्धेची विजेती घोषित करणे चुकीचे आहे. जुरीने डिसिल्वाच्या डोक्‍यावरून जेव्हा ताज उतरवला तेव्हा तिचे केस खेचले गेले. यानंतर डिसिल्वा रडत रडत मंचावरून उतरली.

जुरीने तेथील उपस्थित लोकांना सांगितले, स्पर्धेच्या नियमानुसार घटस्फोटित महिला या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. यासाठी तिचा या किताबावर अधिकार नाही. या मुकुटावर दुसऱ्या स्थानावरील महिलेचा अधिकार आहे. सौंदर्य स्पर्धेत आयोजकांनी जेव्हा ज्युरीच्या दाव्याचा तपास केला तेव्हा आढळले की डिसिल्वाने आतापर्यंत घटस्फोट घेतलेला नाही. यानंतर आयोजकांनी डिसिल्वाची माफी मागितली.
डिसिल्वा आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. मात्र तिने अद्याप घटस्फोट घेतलेला नाही. मंचावर आपल्यासोबत झालेल्या अपमानाबाबत ती कायदेशीर कारवाई करणार आहे. आपल्या फेसबुक पोस्टवर तिने सांगितले की या घटनेनंतर ती रूग्णालयात गेली आणि आपली जखम डॉक्‍टरांना दाखवली. तिने लिहिले, माझा अजून घटस्फोट झालेला नाही. खऱ्या अर्थाने क्वीन ती नसते जी एखाद्या महिलेच्या डोक्‍यावरून ताज उतरवत असेल तर खरी क्वीन ती असते जी गुपचूप दुसऱ्या महिलेच्या डोक्‍यावर ताज ठेवेल.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.