हडपसर – चिंतामणी नगर मधील काही गल्ली मधील अंतर्गत ड्रेनेजचे पाणी मुख्य रस्त्यांवर येत आहे. याशिवाय हांडेवाड रोड परिसरातही मागील सहा महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हांडेवाडी रोडवरील चिंतामणी नगर भागातील अंतर्गत ड्रेनेज लाईन व मुख्य रोडवरील ड्रेनेज लाईन तुडुंब भरून वाहत आहे.त्यामुळे रस्त्यावर वाहने चालविताना वाहनचालक यांना कसरत करावी लागत आहे. तर, ड्रेनेजचे पाणी पादचारी यांच्या अंगावर उडत आहे.अनेकदा ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या लाईन मध्ये मिसळत आहे.
त्यामुळे परीसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंग्यू व साथीच्या रोगांनी नागरिक हैराण झाले आहेत.महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे भाजपचे माजी उपाध्यक्ष जीवन जाधव यांनी सांगितले.
हांडेवाडी रोड व चिंतामणी नगर भागात रस्त्यावर येणाऱ्या ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे रस्त्यावरून नागरिकांना चालणे सुद्धा अवघड झाले आहे. महापालिका प्रशासनास वेळोवेळी तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही.महापालिका प्रशासन येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.
फारूक इनामदार (माजी नगरसेवक)