कर्डिलेंसह विखे गटासमोर मताधिक्‍क्‍याचे आव्हान

विकास अन्‌ जनसेवा मंडळाच्या अस्तित्वाची लढाई ; नवमतदारांचा कल ठरणार निर्णायक

अनिल देशपांडे

राहुरी –राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील सेमिफायनल सामना म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तूलनेत बराच फरक आहे. तरीही सध्याची लोकसभा निवडणुकीचे पुढील निवडणुकीच्या दृष्टीने विशेष महत्व आहे. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मिडीया यांचा जसा प्रभावीपणे वापर दिसतो.तसाच प्रचारमाध्यमांचे सर्वच मार्ग हाताळले जात आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी यांना या मतदारसंघात 42 हजारांचे मताधिक्क मोदी लाटेत मिळाले होते. ते अबाधित ठेवून वाढविण्याचे आव्हान आमदार शिवाजी कर्डिले व विखे गटासमोर आहे. तर मोदी लाट आता ओसरली असल्याने प्रश्‍नांच्या आधारे आपल्याला आघाडी मिळेल असा दावा महागठबंधनद्वारे केला जात आहे. नेमका कोणाचा दावा वास्तविक आहे, हे निवडणूक निकालानंतरच समजेल.

सर्वाधिक औत्सुक्‍याचा विषय म्हणजे आ. कर्डिले समर्थक मतदार कार्यकर्ते काय करणार याची आहे. भाजपचे कार्यकर्त्यांची मानसिकता पक्षादेशास प्राधान्याची आहे. त्यांना पक्षाचा निर्णय मान्य दिसतो आहे. विखेंच्या कार्यशैली विषयी वेगळी मते असली तरीही फिर एक बार मोदी सरकार या भावनेतून पक्ष कार्यकर्ते कार्यरत झालेले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे खा.गांधी यांना मिळालेल्या मताधिक्‍यात आ. कर्डिले व विखे गटाच्या मिळालेल्या छुप्या मदतीचा वाटा होताच.अर्थात मोदी लाटच एवढी प्रभावशाली होती, की त्यामुळेच प्रवरा परिसरात मिळालेल्या मताधिक्‍याचे श्रेय मोदींना की प्रवरा परिसरात मिळालेल्या छुप्या मदतीस द्यावयाचे हा प्रश्‍नच आहे. आता तर आ. कर्डिले व विखे गट हातात हात घालून फिरत आहेत.

तालुक्‍यात गावनिहाय यंत्रणा कार्यरत झाली आहे. बुथनिहाय त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. निवडणुकीच्या निकाल लागेपर्यंत माझ्याकडे संशयाने पाहिले जात असले तरी निकालाने सर्व काही स्पष्ट झालेले असेल असे आ.कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे. आ. कर्डिले मित्रमंडळाच्या नावाखाली काही कार्यकर्ते मात्र विखेंच्या प्रचारात सामील झालेले दिसत नाहीत. ते मात्र आमदार संग्राम जगताप यांचे प्रचारात सामील झाले आहेत.

तालुका विकास मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष चाचा तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच निवडणूक आहे. विकास मंडळ सर्वपक्षीय स्वरुपाचे आहे. मात्र नेमका या निर्णयास व्यापक पाठिंबा मिळावा, अशी काही व्यूहरचना किंवा तसे या पाठिंब्याचे स्वरुप दिसत नाही. तशा प्रकारची वातावरण निर्मिती करणारे कै.नाना धुमाळ सारखे नेतृत्व सध्याच्या विकास मंडळाचे नाही. परिणामी विकास मंडळाचा पाठिंबा डॉ. सुजय विखे यांना मिळाला आहे. विकास मंडळाचे मूलतः स्वरूप तनपुरे यांना विरोध हे आहेच. त्यामुळे काही राष्ट्रवादी समर्थकांनी विकास मंडळाचे निर्णयास राजकीय विरोध केला असला तरीही या पाठिंब्याच्या निर्णयाचा डॉ. विखेंना फायदा संभवतो. तनपुरेंच्या ताब्यात असताना डॉ.तनपुरे कारखान्याचे चाक कायमचेच बंद पडले. तो कारखाना सुरू होण्याची शक्‍यता खूपच कमी होती. ते एक आव्हान डॉ. विखेंनी स्विकारले. कारखान्याचा सलग दुसरा गळीत हंगाम यशस्वी केला.

ऊस उत्पादकांना योग्य भावाचे माप पदरात वेळेत टाकले. ही विखेंसाठी निश्‍चितच जमेची बाजू आहे.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंनी ही तालुक्‍यात गावपातळीवर बैठका घेतल्या. विखेंच्या प्रचारात भर थेट वैयक्तिक गाठीभेटींवर आहे.अशी यंत्रणा प्रभावीपणे उभारण्यात विखेंची पी.एच.डी आहे. तेवढी तोडीस तोड यंत्रणा उभारण्याचे आव्हान आ.जगताप यांच्यासमोर आहे. त्यांची मुख्यतः भिस्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे व त्यांच्या जनसेवा मंडळावर आहे. शेतकरी मंडळाचे सर्वसर्वा शिवाजी गाडे यांचे अकस्मात निधन झाले आहे.

अखेरच्या दिवशी देखील ते संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रीय होते. आता त्यांच्या शेतकरी मंडळाने आघाडीचे उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. ही निश्‍चितीच आघाडीची जमेची बाजू आहे, पण शिवाजी गाडेंचे नसणे हे बरेच परिणामी ठरु शकते. आ.जगताप यांचे प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कणगर येथे जाहीर सभा झाली. त्यांच्याही प्रचाराचा भर वैयक्तिक गाठीभेंटीवर आहे. आ. जगताप यांच्यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे व जनसेवा मंडळाने तालुका पिंजून काढला आहे. आघाडीस मताधिक्क मिळावे, यासाठी ते प्रयत्नशिल आहेत.

विखे गट कॉंग्रेसमधून बाहेर असल्याने तालुक्‍यात कॉंग्रेसची ताकद बाळासाहेब थोरात गटापुर्तीच मर्यादित झाली आहे. कॉंग्रेसचे व विकास मंडळाचे तालुकाध्यक्ष असलेले चाचा तनपुरे डॉ. विखेंच्या प्रचारात सक्रीय आहेत. नगरपालिका निवडणूकीत ज्यांचे अर्थातच तनपुरेंच्या विरोधात चाचा तनपुरे लढले होते. त्यामुळेच परत त्यांचे समवेत जाणे त्यांना राजकीय दृष्टीने गैरसोयीचे वाटले. मोदी सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा शेतकरी, शेती व्यापारी या क्षेत्रावर झालेला विपरीत परिणाम हा आघाडीने प्रचारात मुद्दा केला आहे. मात्र पुलवामा घटनेनंतर प्रचाराचे मुद्दे बदलले असून राष्ट्रीय सुरक्षा, आंतकवाद आणि कणखर भुमिका घेणारे मजबूत केंद्र सरकार हेच मुद्दे केंद्रस्थानी आलेले दिसतात.

देशासमोरील प्रश्‍नांवरील पक्षाच्या भूमिकांना महत्व प्राप्त झालेले दिसते. त्यात दैंनदिन समस्यांचे महत्व प्रचारात कमी दिसते आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न ज्यांना सोडवता आले नाही त ते आता आम्ही ते सोडवू असा दावा करीत आहेत. मात्र तो पचनी पडताना दिसत नाही. पंधरा हजार मतदार प्रथमच नव्याने मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. त्यांचा कल जीकडे राहील तो उमेदवार मताधिक्क घेईल एवढे निश्‍चित.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.