करोनावर मराठी पुस्तक
पुणे – करोनाबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असून गैरसमज अधिक आहेत. गैरसमजामुळे विनाकारण भीती निर्माण होत असून ती दूर करण्याचे काम “ड्रॅगनचे करोनास्त्र’ हे पुस्तक करेल, यात शंका नाही. करोनाबाबत माहिती देणारे पहिलेच पुस्तक आणि तेही आपल्या मायमराठीत लिहिले गेल्याने अभिमानाने ऊर भरून आला असल्याचे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले व वासुदेव कुलकर्णी लिखित व श्री गंधर्व-वेद प्रकाशित ड्रॅगनचे करोनास्त्र पुस्तकाचे प्रकाशन करमळकर यांच्या हस्ते पुणे विद्यापीठात झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अर्थतज्ञ अभय टिळक, ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले, प्रकाशक दीपक व प्रकाश खाडीलकर उपस्थित होते.
करमळकर म्हणाले की, सोशल मीडियामुळे नाहकपणे घबराट पसरविण्याचे काम होते. आलेला मेसेज शहानिशा न करता फॉरवर्ड केला जात असून यामुळे अफवांना उधाण येते. असल्या फॉरवर्डेड मेसेजची देवाण-घेवाण करणे आपण तातडीने थांबविले पाहिजे.