ढाका : शेख हसीना यांच्या ब्रिटनमध्ये स्तायिक असलेल्या भाचीच्या मालमत्तांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बांगलादेशचे मुख्य सल्लागार डॉ. युनूस यांनी ब्रिटन सरकारकडे केली आहे. हसीना यांची भाची तुलिप सिद्दीक या ब्रिटनमध्ये मंत्री आहेत. त्या आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून शेख हसीना पंतप्रधान असतानाच्या काळात बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमवली असल्याचा संशय डॉ. युनूस यांनी व्यक्त केला आहे. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे.
हसीना यांनी पंतप्रधान असतानाच्या कार्यकाळात गैरमार्गाने कमावलेली संपत्ती परदेशातल्या नातेवाईकांकडे हस्तांतरित केली आहे. या मालमत्ता जर निव्वळ चोरीच्या मार्गाने कमावल्याचे निष्पन्न झाल्यास तुलिप सिद्दीक यांना भेट दिलेल्या मालमत्ता बांगलादेशला परत देण्यात याव्यात. तसेच जर शक्य झाल्यास आवामी लीगच्या नेत्यांनी खरेदी केलेल्या मालमत्ताही बांगलादेशला परत देण्यात याव्यात, अशी मागणीही डॉ. युनूस यांनी केली आहे. ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने डॉ. युनूस यांच्या आरोपांचा तपास करण्याची तयारी दाखवल्याचेही समजते आहे.
कोण आहेत तुलिप सिद्दीक ?
तुलिप सिद्दीक या ब्रिटनमधील मजूर पक्षाच्या मंत्री असून त्यांच्याकडे आर्थिक मंत्रालय आणि भ्रष्टाचार नियंत्रणाची जबाबदारी आहे. डॉ. युनूस यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर ब्रिटनमधील वर्तमानपत्रांनी तुलिप सिद्दीक यांच्या राजीनाम्याची मागणी करायला सुरुवात केली आहे. लंडनमधील हॅम्पस्टेड येथील निवासस्थानी अनेक वर्षांपासून त्यांचे वास्तव्य आहे. ही मालमत्ता पनामा पेपर्सच्या यादीत नाव असलेल्या विदेशी कंपनीने आणि दोन बांगलादेशी उद्योजकांनी खरेदी करून दिल्याचा दावा एका अन्य इंग्रजी वर्तमानपत्रानेही केला आहे.