व्यक्‍तिवेध : कै. डॉ. यशवंत पाठक

-डॉ. अरविंद नेरकर

संतसाहित्य अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे नुकतेच नाशिक येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने संतसाहित्य हीच जीवनधारा असलेला, आपल्या ओजस्वी रसाळ वाणीने मंत्रमुग्ध करणारा व्याख्याता अनंतात विलीन झाला. कै. यशवंत पाठक यांचा जन्म नाशिकचा. त्यांचे शिक्षणही नाशिक येथे झाले. त्यानंतर मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिराच्या महाविद्यालयात 35 वर्षे अध्यापनाचे कार्य केले.

इ.स. 1978 मध्ये कीर्तन परंपरा व मराठी साहित्य या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच.डीसाठी मार्गदर्शन केले. अध्यापनातून निवृत्त झाल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुख म्हणून 9 वर्षे काम पाहिले. या अध्यासनामार्फत त्यांनी अनेक उपक्रम राबवले. मी पुणे विद्यापीठात जनसंपर्क संचालक पदावर काही काळ कार्यरत असताना यशवंत पाठकांशी विशेष संपर्क आला. अतिशय मृदुभाषी, संतसाहित्य अगदी जीवनात परिपूर्ण उतरलेले पाठक सर माझ्या कायम स्मरणात राहतील. त्यांची व्याख्याने ऐकलेला मी भाग्यवान श्रोता आहे.

माझा पंढरपूर वारी आणि मराठी साहित्य हा संशोधन विषय. या विषयात मला पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी इ.स. 1995 ला मिळाली. नोकरी सांभाळून मी मिळवलेल्या यशाचं त्यांना कौतुक वाटायचे. पुणे विद्यापीठात ज्या काळात मी काम केले त्या अल्पकाळात यशवंत पाठकांना वेळोवेळी भेटण्याचा योग येईल. कै. यशवंत पाठक सरांचे वडील गौतमबुवा हे मूळचे पिंपळनेर येथील प्रख्यात कीर्तनकार आणि थोर स्वातंत्र्यसैनिक होते. ते पुढे नाशिकला स्थायिक झाले.

पाठक सरांनी मनमाडला राहूनही वेळोवेळी नाशिक येथे सार्वजनिक वाचनालय, वसंत व्याख्यानमाला लोकहितवादी मंडळ तसेच नाशिक येथील महाविद्यालये या ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून नाशिकच्या सांस्कृतिक जीवनाशी एकरूप झाले. तसेच नाशिकमधील कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, नाटककार वसंतराव कानेटकर, ज्येष्ठ संपादक दादासाहेब पोतनीस यांसारख्या व्यक्तींच्या संपर्कातही असावयाचे.

डॉ. पाठक यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांची 21 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी “नाचू कीर्तनाचे रंगी’, “अंगणातले आभाळा’, “येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ’, “निरंजनाचे माहेर’ या चार पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार लाभला आहे. अतिशय ओघवत्या शैलीत आणि माहितीपूर्ण असलेली पुस्तके त्यांच्या समर्थ लेखनाचे प्रतीक म्हणता येईल. त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. वयाची सत्तरी ओलांडल्यावरही त्यांचे लेखन, वाचन, चिंतन, मनन अखंड चालू होते.

ते उत्तम वक्ते म्हणूनही महाराष्ट्रभर इ.स. 1970 पासून ठिकठिकाणी दिलेल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाने सर्व परिचित होते. संतवाङ्‌मय, संस्कृती, तत्त्वज्ञान या विषयावरील त्यांची व्याख्याने श्रोत्यांच्या कायम स्मरणात राहतील. नैनीताल येथील पूर्णयोगी श्री. अरविंद आश्रमात चार वर्षे श्री. अरविंदांच्या तत्त्वज्ञानावर त्यांनी निरुपण केले. तसेच आकाशवाणी, दूरदर्शनवरील कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. या संतसाहित्य अभ्यासकास भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave A Reply

Your email address will not be published.