जागतिक आरोग्य संघटनेत डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मोठी जबाबदारी

नवी दिल्ली – जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, भारताला करोना रोखण्यात काही अंशी यश आले आहे. यामुळे भारताच्या करोनाविरोधातील उपाययोजनांची जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

डॉ. हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २२ मे पासून ते पदभार सांभाळणार असल्याची माहिती मिळत आहे. जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा डॉ. हर्षवर्धन घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झाले. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. २२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रीय समुहांमध्ये या कार्यकाळी मंडळाचं पद एका वर्षासाठी रोटेशनवर देण्यात येते. यानुसार पहिल्या वर्षासाठी हे पद भारताकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या समितीचे कामकाज पूर्णवेळ चालत नाही. या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते. आरोग्य सभेनंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते. तसेच आरोग्य सभेच्या सर्व नियांवर व धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.