पलूस – सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला असून या अपघातात दोन पोलिस जखमी झाले आहेत. पलूस तालुक्यातील नागठाणे येथे हा अपघात झाला आहे.
डॉ. विश्वजीत कदम सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान पलूस तालुक्यातील नागठाणे येथे पोलिसांच्या पायलट गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात दोन पोलिस जखमी झाले आहे. जखमी पोलिसांना डॉ. कदम यांनी स्वतःच्या गाडीतून आष्टा येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांच्या पायलट गाडीसमोर अचानक एक दुचाकी आली. या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पोलीस गाडी चिखलामुळे घसरली आणि समोरच्या इलेक्ट्रिक खांबावर धडकली. जखमी पोलिसांवर उपचार चालू करण्यात आले आहेत.