Curfew Effect | सात दिवसानंतर रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल – डाॅ. तात्याराव लहाने

मुंबई – महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नवीन करोनाबाधितांची संख्या दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु मागील दोन-तीन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच आहे. मात्र संचारबंदीच्या सात दिवसांनी रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना डाॅ. लहाने यांनी ही माहिती दिली.

“संचारबंदीमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. लोकांनी गरज नसताना संचार करू नये. रुग्ण संख्या कमी होण्यासाठी संचारबंदी खूप महत्त्वाची असून संचारबंदीचा परिणाम हा सात दिवसांनी दिसेल. सात दिवसांनी रुग्ण संख्येत घट होण्यास सुरुवात होईल. तसेच कोरोनाची लक्षणे दिसल्यास ते अंगावर न काढता तातडीने उपचार सुरु करावेत. आजार बळावल्यानंतर उपचार करणं कठीण जाते,” असे डाॅ. तात्याराव लहाने म्हणाले.

20 एप्रिलनंतर रेमडेसिवीरचा तुटवडा कमी होईल, ऑक्सिजनसाठी इतर राज्यांशी चर्चा सुरु आहे, राज्यात 100 टक्के ऑक्सिजन रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे, असेही डाॅ. लहाने यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. काल (ता.16) दिवसभरात राज्यात 63 हजार 729 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली होती. तर 398 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.