पुणे – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) महायुतीकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने पक्षाचे प्रमूख पदाधिकारी तथा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
डॉ. धेंडे यांनी रामदास आठवले यांच्यासह पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आरपीआय पक्षामध्ये गेली २७ वर्ष कार्य करत आहे. आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासह राजकीय पदाचा उपयोग करून समाजाला न्याय देण्याच्या कामात पुढाकार घेतला आहे. पक्षाच्या धोरणानुसार विविध राजकीय भूमिकेला नेहमीच समर्थन दिलेले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून आरपीआयला महायुतीकडून सन्मानाची वागणूक दिली जात नाही. याबाबतच्या भावना पदाधिकारी, कार्यकर्ते देखील बोलून दाखवत आहेत, असे डॉ. धेंडे यांनी नमूद केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीतही एकही जागा महायुतीने आपल्या पक्षाला दिलेली नाही. विधानसभेमध्ये पक्षाला स्वतंत्र निवडणूक चिन्ह असूनही आपले प्रतिनिधीत्व द्यायला महायुतीमधील पक्ष तयार नाहीत असे दिसते. त्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजीचा सूर असल्याचेही डॉ. धेंडे यांनी म्हटले आहे. आरपीआयचे कार्यकर्ते महायुतीचे काम करणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.