सातारा (प्रतिनिधी) – धोम-वाई हत्याकांड खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची सरतपासणी सुरू असून, संतोष पोळने खून केलेल्या मंगल जेधे यांच्याशी आठ दिवसांमध्ये तब्बल 31 तास बातचित झाल्याचे तिने न्यायालयाला सांगितले;
दरम्यान, आरोपी संतोष पोळ याने कारागृहातून अर्ज न करता फक्त वकिलांच्या माध्यमातून न्यायालयापुढे तक्रारी मांडाव्यात, अशी तंबी न्यायाधीशांनी दिली.
या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी सातारा येथे जिल्हा न्यायालयात सुरू असून, गुरुवारी नियमित सुनावणी झाली. या खटल्यातील आरोपी व कथित डॉक्टर संतोष पोळ हा तुरुंगातून वारंवार तक्रार अर्ज करत असल्याने न्यायाधीशांनी त्याला खडसावले.
प्रत्येक सुनावणीसाठी तुम्हाला साताऱ्यात आणले जाते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही होते. त्यावेळी तुम्ही तक्रार करत नाही. तुरुंगात गेल्यावर तक्रार अर्ज करता. यापुढे फक्त वकिलांच्या माध्यमातून अर्ज करा, असे न्यायाधीशांनी बजावले.
दरम्यान, उलटतपासामध्ये मंगल जेधे व माफीची साक्षीदार ज्योती यांच्यात आठ दिवसांत तब्बल 31 तास फोनवरून चर्चा झाल्याचे, पोलिसांनी दाखल केलेल्या सीडीआरमधून स्पष्ट झाले. याशिवाय मेसेज झाल्याचेही स्पष्ट झाले. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, आरोपी सतोष पोळ, बचाव पक्षाचे वकील न्यायालयात उपस्थित होते. या खटल्याची सुनावणी उद्या, दि. 29 रोजी होणार आहे.