नवी दिल्ली – करोना महामारीच्या काळात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असले तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यास अपवाद आहे. गडकरी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुबईत स्थायिक डॉ. संजय पैठणकर यांनी नागपूरला 650 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि 400 ऑक्सिजन सिलिंडरची मदत केली आहे. यातील 150 कॉन्सट्रेटर तत्काळ मदत म्हणून विमानाने पाठविण्यात आले आहे.
करोनाच्या बिकट परिस्थितीत नागपूरकरांना ऑक्सिजन आणि इंजेक्शनच्या अभावापोटी आपला जीव गमवावा लागत आहे. त्यांना या मगरमिठीतून सोडविण्यासाठी दुबईचे डॉ. संजय पैठणकर पुढे आले आहेत. ते मूळ नागपूरचे असून गोकुळपेठेत त्यांचे घर आहे. याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी डॉ. पैठणकर यांचे मित्रत्वाचे संबध आहेत.
नितीन गडकरी यांनीच परदेशात स्थायिक झालेल्या मराठी लोकांना महाराष्ट्राची मदत करण्याचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत डॉ. पैठणकर यांनी नागपूरला 650 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि ऑक्सिजनच्या 400 सिलिंडरची मदत केली आहे. यातील 150 कॉन्सट्रेटरची खेप हॉंगकॉंगमार्ग विमानाने नागपूरसाठी रवाना करण्यात आली आहे. उर्वरित 500 कॉन्सट्रेटर आणि दोनशे-दोनशे सिलिंडरचे दोन कंटेनर जहाजाने रवाना करण्यात आले आहे. ते 15 मे च्या आसपास मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे.
डॉ. पैठणकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, दुबईतील मराठी माणसं नागपूरला सर्वतोपरी मदत करण्यासाठी एकजूट झाली आहेत. ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी जुळवाजुळव करीत आहेत. मात्र, दुबईमध्ये इंजेक्शन तयार होत नाही. यामुळे ते कल्पनेपेक्षा जास्त महाग आहेत. अशात, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि सिलिंडर पाठविण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे उत्पादन चीनमध्ये होते. यामुळे कॉन्सट्रेटर तेथून खरेदी करावे लागले. परंतु, चीनहून भारतासाठी थेट विमान नसल्यामुळे नागपूरला पाठवायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला. यावर डॉ. पैठणकर यांनी हुकमी उपाय शोधून काढला. हे कॉन्सट्रेटर चीनहून हॉंगकॉंगला पाठविले. हॉंगकॉंगहून दिल्ली आणि तेथून नागपूर अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
कॉन्सट्रेटर हे ऑक्सिजन मिळविण्याचे उत्तम आणि स्वस्त असे स्रोत आहे. वातावरणात 21 टक्के ऑक्सिजन असतो. कॉन्सट्रेटर हवेतील ऑक्सिजन शोषून घेते आणि त्याचा साठा करून रुग्णाला पुरविता येते.
मजेची बाब म्हणजे, एक कॉन्सट्रेटरची किंमत 200 डॉलर आहे. आणि याचा वाहतुकीचा खर्च हा 150 डॉलर आहे. मुळात, परदेशस्थ भारतीय देशाची मदत करू इच्छितात. परंतु, कस्टम ड्युटी आणि जीएसटीचा खर्च कोण उचलणार? हा प्रश्न त्यांना बेजार करीत असतो. परंतु आता सरकारने कस्टम ड्युटी आणि जीएसटी माफ केल्यामुळे वैद्यकीय साहित्य पाठविणे सोपे झाले आहे, असे डॉ. संजय पैठणकर यांनी सांगितले.