डॉ. साळवे यांची पुन्हा गच्छंती; लक्ष्मण गोफणे यांच्याकडे जबाबदारी

  • निविदा, बिले अदायगींसह, वैद्यकीय विभागाचे संपूर्ण कामकाज

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा विस्फोट झालेला असतानाच प्रशासकीय यंत्रणा अपेक्षित ताकदीने कार्यान्वित नसल्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे. हे वाटप करताना डॉ. पवन साळवे यांच्याकडील जबाबदारी काढून घेत त्यांची गच्छंती केली असून, त्यांच्याकडील बहुतांश जबाबदारी सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यावर सोपविली आहे. यापुढे साळवे यांच्याकडे समन्वय, पर्यवेक्षक आणि पत्रव्यवहाराची जबाबदारी राहणार आहे.

शहरात सध्या करोनाने हाहाकार माजविला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या ही अडीच हजारांच्या आसपास आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वैद्यकीय विभागाचे निर्णय घेण्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र गेल्या दीड महिन्यापासून करोनाचा उद्रेक झाल्यानंतरही निर्णय घेण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्ये पालिका प्रशासनाविषयी नाराजी निर्माण झाली होती.

बेड आणि सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही पालिका प्रशासनाबाबत उद्रेक निर्माण होऊ लागला होता. पालिकेकडून प्रशासकीय निर्णय गतिमान झाले पाहिजेत तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सुसूत्रता आणावी यासाठी आयुक्तांकडे वारंवार मागणी केली जात होती. नागरिकांमधील नाराजी, सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे आज रविवारी (दि. 11) महापालिका आयुक्तांनी चार अधिकाऱ्यांमधील कामकाजाचे फेरवाटप करताना डॉ. गोफणे यांच्याकडे कोविडसह बहुतांश जबाबदारी सोपविली आहे.

नव्या कामकाज वाटपानुसार डॉ. साळवे यांच्याकडे महापालिकेच्या सर्व कोविड केअर सेंटरसह ऑटो क्‍लस्टर, जम्बो हॉस्पिटलच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी असणार आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कात राहून पत्रव्यवहार व कोविडविषयक कामकाजाचे समन्वय साधावे लागणार आहे. डॉ. गोफणे यांच्याकडे वैद्यकीय विभागामार्फत करण्याच्या येणारे सर्व निविदा विषयक कामकाज, सर्व प्रकारची बिले अदायगी, खासगी रुग्णालयांचे रजिस्ट्रेशन, वायसीएम वगळता वैद्यकीय विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व रुग्णालये, दवाखान्यांचे अस्थापना व संपूर्ण प्रशासकीय कामकाज सोपविण्यात आले आहे. या शिवाय वैद्यकीय विभागासाठी मानधनावरील मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारीही यापुढे गोफणे यांच्याकडे राहणार आहे.

डॉ. रॉय यांच्याकडील जबाबदारी “जैसे थे’
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्याकडील सध्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. त्यांच्याकडे आरोग्य विभागाची सध्या असलेली जबाबदारी तसेच वॉर रुमच्या समन्वयासह कोविड विषयक सोपविलेली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

करोना तपासणीची जबाबदारी
डॉ. वर्षा डांगे यांच्याकडे
पिंपरी-चिंचवड शहरातील करोना तपासणीच्या प्रमुख म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील संपूर्ण करोना चाचण्यांची जबाबदारी डांगे यांच्याकडे राहणार आहे. याशिवाय कोविड विषयक संपूर्ण लसीकरणाची जबाबदारीही डॉ. डांगे यांच्याकडे सोपविण्यात आली असून लसीकरण केंद्रांवरही त्यांना नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तसेच शासनाला कोविड विषयक कामकाजाचे अहवाल पाठविण्याची जबाबदारीही डॉ. डांगे यांच्यावर राहणार आहे.

सातत्याने फेरबदल
पिंपरी-चिंचवड शहरात कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वैद्यकीय विभागाच्या जबाबदारीमध्ये अनेकदा फेरबदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला डॉ. पवन साळवे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर डॉ. अनिल रॉय यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र रॉय यांची विभागीय चौकशी सुरू झाल्यानंतर ही जबाबदारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे सोपविण्यात आली. गोफणे यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर तात्कालीन आयुक्त डॉ. श्रावण हर्डीकर यांनी अवघ्या पंधरा दिवसांतच गोफणे यांच्याकडील जबाबदारी काढून घेत डॉ. पवन साळवे यांना दिली होती. मात्र, साळवे यांच्या कामकाजाबाबत ओरड सुरू झाल्याने पुन्हा गोफणे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.