विविधा: डॉ. सालीम अली

माधव विद्वांस

भारताचे आद्य पर्यावरणवादी, निसर्गमित्र, पक्षीमित्र डॉ. सालीम अली यांचा जन्म मुंबई येथे 12 नोव्हेंबर 1896 रोजी झाला. त्यांना “बर्डमॅन ऑफ इंडिया’ म्हणून संबोधले जाते. ते एक वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे तर तीन वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. ते नऊ भावंडांत सर्वांत लहान होते. त्यांच्या मामानेच त्यांचे संगोपन केले.ते प्राथमिक शाळेत असताना त्यांना वरचेवर डोकेदुखीचा त्रास होऊ लागला म्हणून त्यांच्या चुलत्याकडे कराची येथे कोरडी हवा म्हणून पाठविले. कसेबसे ते वर्ष 1913 मध्ये मॅट्रिक झाले. लहानपणी त्यांना एक छऱ्याची बंदूक भेट म्हणून मिळाली होती. या बंदुकीने ते छोटे पक्षी मारीत असत व त्यातूनच त्यांना पक्षी निरीक्षणाची गोडी लागली व पक्ष्यांचे वेगवेगळे प्रकार ते ओळखू लागले. लहानपणी पक्ष्यांची शिकार करता करता ते पक्षीमित्र झाले. ते वयाच्या दहाव्या वर्षांपासून डायरी लिहू लागले व त्यात पक्ष्यांची नोंद ठेवू लागले.

त्यांचे पक्षीप्रेम पाहून त्याचे मामा त्याला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संचालकाकडे घेऊन गेले. शालेय शिक्षणानंतर त्यांना प्राणिशास्त्रात पदवी घ्यायची होती; परंतु शास्त्रातील अनेक अवघड विषयांमुळे त्यांनी माघार घेतली. काही काळासाठी ते आपल्या बंधूना धंद्यात मदत करण्यासाठी ब्रह्मदेशात गेले. तेथे त्यांना जंगलात फिरण्याची चांगली संधी मिळाली व अनेक नवीन पक्ष्यांची ओळख झाली त्याच्याही त्यांनी नोंदी ठेवल्या. बंधूंचा व्यावसायिक जम न बसल्याने ते परत मुंबईत आले. सालीम अली शूटिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असत. त्यांनी कॉमर्स कॉलेजमध्ये व्यावसायिक कायदेविषयक अभ्यासासाठी प्रवेश घेतला. पण फादर एथेलबर्ट ब्लॅटर यांनी त्यांचे पक्षीप्रेम पाहून सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये प्राणिशास्त्रवर्गात उपस्थित राहण्यास सांगितले व प्राणिशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केला.

याच वेळी त्यांचा तेहमिना यांचेशी प्रेमविवाह झाला. त्यांच्या पत्नीनेही त्यांच्या या आवडीला प्रोत्साहन दिले. सालीम अली भारतातील पक्षी सर्वेक्षण आयोजित करणारे पहिले भारतीय होते आणि त्यांनी पक्ष्यांवर अनेक पुस्तके लिहून ठेवली. 1947 मध्ये ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमधील एक महत्त्वाची व्यक्‍ती झाले व नष्ट होत चाललेले भरतपूर येथील केवलदेव राष्ट्रीय उद्यान वाचविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. त्यांनी सिडने डिलन रिपली यांच्यासोबत भारत आणि पाकिस्तानमधील पक्ष्यांच्या दहा खंडांची पुस्तिका तयार केली.

वर्ष 1926 मध्ये मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात नव्याने उघडलेल्या नैसर्गिक इतिहासाच्या विभागात त्यांना मार्गदर्शक व्याख्याता म्हणून नियुक्‍त करण्यात आले.दोन वर्षांनंतर ते जर्मनीला बर्लिनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये प्रोफेसर इरविन स्ट्रेसमॅन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी गेले होते. अलिबाग परिसरामध्ये अनेक प्रकारचे पक्षी असल्यामुळे किहीम येथील वास्तव्यानंतर सालीम यांनी सुगरण पक्ष्यावर आधारित एक शोधनिबंध बीएनएचएसच्या जर्नलसाठी लिहिला. या निबंधामुळे ते पक्षीतज्ज्ञ म्हणून जगात ओळखले जाऊ लागले. 1958 मध्ये पद्मभूषण व 1976 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सरकारने त्यांना सन्मानित केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.