प्रतिकूलतेवर मात करीत ‘धन्वंतरी’ची सेवा

डॉ. रवींद्र टेमगिरे यांची रुग्णसेवेशी बांधीलकी

शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सर्व सुविधांनी युक्‍त असलेले सूर्या हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र टेमगिरे हे घरची परिस्थिती नाजूक असताना देखील शेतकरी कुटुंबातून उच्च शिक्षण घेत डॉक्‍टर बनले आहेत. जिद्द ठेवल्यास परिस्थिती नसताना देखील माणूस काहीही करू शकतो, हे डॉ. टेमगिरे यांनी दाखवून दिले आहे.

बुरुंजवाडी गावामध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात रवींद्र टेमगिरे यांचा जन्म झाला. रवींद्र यांनी बुरुंजवाडीतून शिक्षणाला सुरूवात केली. पुढील काळात शिक्षणासाठी अडचणी आल्या. परंतु आपण शिकून काहीतरी करायचेच, हे त्यांनी ठरवले. त्यावेळी चांगल्या मार्कांनी पास झाल्यामुळे व त्यांचे चुलते किसान संघाचे अध्यक्ष मधुकरआण्णा टेमगिरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचे ठरवल आणि धुळे येथील इंजिनिअरिंग विद्यालयात प्रवेश घेतला. त्यांचा नंबर मुंबई येथील तेरणा मेडिकल कॉलेजला लागला.

अवाढव्य फी त्यावेळी होती, त्यामुळे वडील शिक्षण नको म्हणाले, तेव्हा काही नातेवाइकांनी मदत केली. वडिलांनी कर्ज काढून शिक्षणासाठी पैसे दिले. त्यामुळे त्यांनी मुंबईत शिक्षण सुरू केले. आपला लहान भाऊ डॉक्‍टर होणार आहे, यासाठी मोठा भाऊ विजय यांनी शिक्रापूर येथील पतसंस्थेत काम करून पंधराशे रुपये लहान भाऊ रवींद्र यांच्या शिक्षणासाठी देऊ लागला. त्यानंतर 2003 मध्ये एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर शिक्रापूरात भाडेतत्त्वावर जागा घेऊन सूर्या हॉस्पिटल सुरू केले. त्याच कालावधीत त्यांचा विवाह झाला. त्यांच्या आरोग्य सेवेत पत्नी डॉ. स्मिता यांचीही साथ मिळाली आहे.

सूर्या हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध
सूर्या हॉस्पिटलमधील सुविधांमुळे हॉस्पिटल अल्पावधीत नावारूपाला आले आहे. डॉ. रवींद्र टेमगिरे व डॉ. स्मिता टेमगिरे यांनी परिश्रमातून स्वतःची जागा घेत हॉस्पिटलची इमारत उभारली आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, या हेतूने सध्या त्यांनी स्वतःचे मंगल मेडिकल फाउंडेशन सुरू करीत त्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यांसह विविध उपक्रम राबवित आहेत.

ग्रामीण भागातील गरीब जनतेला सिटी स्कॅन, एक्‍स-रे, विविध तपासण्यासाठी पुणे येथे जावे लागायचे म्हणून शिक्रापूर येथे सुविधा उपलब्ध केल्या. शिरूर तालुक्‍यामध्ये प्रथमच गरीब जनतेसाठी पन्नास टक्‍के रकमेमध्ये त्यांनी सुविधा सुरू केल्या आहे. सध्या शिक्रापूर येथे 50 खाटांचे व पंधरा ते वीस डॉक्‍टर्स व कामगारांचे, असे टेमगिरे यांचे सूर्या हॉस्पिटल आहे. भविष्यात मोठी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून जनतेची सेवा करण्याचा डॉ. रवींद्र टेमगिरे व डॉ. स्मिता टेमगिरे यांचा मानस आले.

Leave A Reply

Your email address will not be published.