डॉ. पायल तडवी आत्महत्या: नायरच्या अधिष्ठातांना महिला आयोगाची नोटीस

मुंबई: नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी महिला डॉक्‍टरांविरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही महिला डॉक्‍टर आरोपी फरार असून या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. तसेच घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासोबतच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगानं मागितला आहे.

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी महाविद्यालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात ऍट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. मात्र, या आरोपी सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मयत तरूणी ही आदिवासी तडवी समाजाची होती. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना तत्काळ अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीकरिता आदिवासी तडवी समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने जळगावात आंदोलन केले गेले. तसेच या प्रकरणी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात असून आरोपांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×