पांडुरंग चौगुले स्मृती पुरस्कार डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांना जाहीर

ज्येष्ठ लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते दि. 10 रोजी पुरस्काराचे वितरण

सातारा – येथील हिरवाई संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पांडुरंग चौगुले स्मृती पुरस्कारासाठी यावर्षी राष्ट्रीय मानव आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांची निवड करण्यात आली आहे. सदरबझारमधील हिरवाई प्रकल्पात होणाऱ्या कार्यक्रमात येत्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, ज्येष्ठ लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका प्रा. संध्या चौगुले यांनी दिली.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, साधनाचे संपादक विनोद शिरसाट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे सध्या राष्ट्रीय मानव आयोगाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. मुळे सर्वांना पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित आहेत. भारतीय परराष्ट्र खात्यातील प्रदीर्घ सेवेमध्ये देशभर 410 पासपोर्ट कार्यालये स्थापन करून त्यांनी पासपोर्टच्या दुनियेत रेकॉर्ड ब्रेक केले आहे.

आतापर्यंत त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे भारतीय व विदेशी भाषांमधे अनुवादही झालेले आहेत. त्यांच्या अनेक कवितांना, साहित्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. “माती पंख आणि आकाश’ हे त्यांचे पुस्तक सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक आहे व त्यांच्या या पुस्तकाचा समावेश उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात करण्यात आलेला आहे.

आठ भाषांची उत्तम जाण असलेले परिपूर्ण साहित्यिक, स्तंभलेखक, ‘जिप्सी’ सिनेमाचे हिरो, परराष्ट्र खात्याचे सचिव, मालदीवच्या भारतीय सांस्कृतिक केंद्राचे संस्थापक अशा डॉ. मुळे सरांची माणसे जोडणे व माणुसकी जपणे ही विशेष गुण आहेत. सध्या निलेवाडी आणि बस्तवाड या दोन पूरग्रस्त गावांना दत्तक घेऊन तेथे काम सुरू केले आहे. मुळे यांच्या याकार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यापूर्वी हा पुरस्कार तानाजी मस्के, महावीर जोंधळे, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. अनुराधा डॉ. अच्युत गोडबोले सौ.निर्मला व संजय साळुंखे, विजय निंबाळकर, रघुनाथ ढोले यांना प्रदान करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.