सहकारनगर – आज वैद्यकीय क्षेत्रात वाढलेले दर व त्याला आलेले व्यावसायिक स्वरूप यामुळे सर्वसामान्य कुटुंब आणि हातावर पोट असणाऱ्यांना लहान आजारात सुद्धा होणारा खर्च परवडणारा नसतो. एकीकडे स्मार्ट सिटीकडे कूच करत असणाऱ्या पुण्यात सर्व सोयीसुविधा असलेले मोठे दवाखाने आहेत; परंतु किरकोळ आजारावरील उपचारास छोटे दवाखाने व अल्पदरात रुग्णांना सेवा देणारे डॉक्टरांची संख्या कमी आहे. मात्र, पद्मावती वसाहत पातळीवर झोपडपट्टी भागात अंदाजे 200 स्के. फूट आकाराच्या दवाखान्यात डॉक्टर नितीन बोरा हे “रुग्णसेवा हेच आपले कर्म’ असे मानून गेल्या 20 वर्षांपासून नागरिकांचा आधार बनले आहेत.
पद्मावती, सहकारनगर, तळजाई वसाहत, लक्ष्मीनगर, चव्हाणनगर, शंकर महाराज वसाहत या भागांतून नागरिक येथे उपचार घेतात. तर भोर, खेडशिवापूर या गावांमधूनही रुग्ण उपचारासाठी येथे येतात. कष्टकऱ्यांना रात्री उशिरा कामावरून आल्यावरही हा दवाखाना रात्री 3 वाजेपर्यंत सुरू असल्याने मदत होते. रात्री अपरात्रीही उपचारासाठी डॉ. बोरा हे उपलब्ध होत असल्याने आजवर परिसरातील अनेकांचे जीव वाचले असल्याची माहिती येथील नागरिक देतात. छोट्या तसेच मोठ्या आजारांवर सुरुवातीलाच योग्य निदान व वेळीच उपचार होत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. मूळ जामखेड येथील असलेले डॉक्टर नितीन बोरा हे डॉक्टरी पेशाबरोबरच अनेक सामाजिक संस्थेवर मोफत वैद्यकीय सल्ला देतात. त्यांनी आजवर आंधर, मावळ आदिवासी भागांत, सातारा ग्रामीण भाग, कायाकल्प संस्था, वारकरी सेवा अशा माध्यमातून हजारो रुगांची मोफत सेवा केली आहे. फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे इतकेच लक्ष ठेवून वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अशा व्यक्तींचा आदर्श पाहणे गरजेचे आहे.
समाजसेवेचा वडिलांकडून वारसा
मोठ्या दवाखान्यात किरकोळ आजारासाठी जाणे म्हणजे जास्त खर्च व वेळ वाया जातो. हातावर पोट असणाऱ्या झोपडपट्टीतील कष्टकऱ्यांना वेळ आणि पैसे या दोन्ही समस्या डॉ. बोरा यांच्या रूपाने सुटतात. बोरा यांचे वडील मोतीलाल बोरा यांनी त्यांच्या मूळ गावातून दुष्काळातून येणाऱ्या शेकडो कुटुंबांना पुण्यात स्थायिक होण्यास मदत केली. वडिलांचा हाच वारसा मिळाला असल्याचे बोरा यांनी सांगितले. तसेच, वडील स्व. मोतीलाल बोरा यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन करून अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. सामान्य परिस्थितिशी लढा देत शिक्षण पूर्ण करून सामाजिक बांधिलकी जपत सेवा देणाऱ्या डॉ. बोरा यांचा आदर्श आजच्या तरुणांनी घेणे गरजेचे आहे.
गेली 10 वर्षांपासून आम्ही घरातील सर्वजण आजारात येथे येतो. अल्पदरात योग्य उपचार येथे मिळत असल्याने आम्हाला मोठा आधार वाटतो.
– मुक्ता मोरे, स्थानिक महिला