डॉ. विखे उमेदवारी अर्ज भरताना खासदार गांधी उपस्थित राहणार

निवडक गांधी समर्थकांच्या उपस्थित दोघांची बंद दाराआड चर्चा

नगर: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली खासदार दिलीप गांधी आणि कॉंग्रेसमधून भाजपमध्ये येत उमेदवारी मिळविलेले डॉ. सुजय विखे यांची आज अखेर भेट झाली. केवळ भेट झाली नव्हे, तर दोघांनी एकत्र नाश्‍ता घेत जवळपास अर्धातास बंद दाराआड आणि त्यानंतर ठराविक गांधी समर्थकांशी चर्चा झाली. डॉ. विखे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे. हा अर्ज भरताना खासदार गांधी यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती डॉ. विखेंनी केल्याचे समजते.

डॉ. विखे यांचे वडील आणि कॉंग्रेसचे स्टार प्रचारक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी असेच अचानक येत रात्री उशिरा खासदार गांधी यांची भेट घेऊन तासभर बंद दाराआड चर्चा केली होती. या चर्चेत खासदार गांधी यांचे पुत्र व बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केलेले सुवेंद्र गांधी देखील होते. त्या चर्चेचा तपशील समजला नसला तरी उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या खासदार गांधी यांना मनविण्याचे प्रयत्न झाले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचे बोलणे करून दिल्याचे बोलले जाते.

शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास डॉ. विखे खासदार गांधी यांच्या निवासस्थानी गेले. त्यांची ही भेट पूर्वनियोजित होती. काल रात्रीच एकमेकांचे फोनवर बोलणे झाल्यानंतर आज डॉ. विखे त्यांच्या भेटीला गेले. सुरूवातीला त्यांनी खासदार गांधी यांचे समर्थक असलेले शहर जिल्हा भाजपचे सरचिटणीस सुनील रामदासी व किशोर बोरा आणि इतर काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्याच्यासमवेत नाश्‍ताही केला. त्यानंतर सुमारे अर्धा तास खासदार गांधी आणि डॉ. विखे यांची बंद दाराआड चर्चा झाली. सोमवारी डॉ. विखे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यावेळी खासदार गांधी व त्यांच्या समर्थकांनी सुवेंद्र गांधी यांच्यासह उपस्थित रहावे, अशी विनंती डॉ. विखे यांनी केल्याचे समजते. मात्र आज या भेटीच्यावेळी सुवेंद्र गांधी जाणीवपूर्वक उपस्थित राहिले नाहीत. “मी भाजपचाच असून, भाजपचाच प्रचार करणार आहे’ ही खासदार गांधी यांनी आजही भूमिका डॉ. विखेंसमोर मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.