आरक्षणाच्या मुद्यावर सुसंवाद व्हायला हवा-डॉ.मोहन भागवत

नवी दिल्ली : देशात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर सर्व राजकिय पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील या निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. कारण संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी आता आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला आहे. आरक्षणाचे समर्थन करणारे आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांदरम्यान सुसंवाद व्हायला हवा, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. दिल्लीत स्पर्धा परिक्षांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या ज्ञान उत्सव या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात बोलत होते.

केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय धाडसी असल्याचे सांगत भागवत यांनी यापुर्वीच सरकारचे कौतूक केले होते. त्यात आता निवडणुकांच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. याविषयी बोलताना भागवत यांनी या आधीही आपण आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र त्यावेळी खूप गदारोळ झाला आणि विषय मूळ मुद्द्यापासून भरकटला होता अशी आठवणही भागवत यांनी करुन दिली. आरक्षणाच्या बाजूने बोलणाऱ्यांनी आरक्षणाला विरोध असणाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन आपली मते मांडायला हवीत, तसेच विरोध करणाऱ्यांनाही समर्थन करणाऱ्यांची बाजू ऐकायला हवी असे भागवत म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलल्यावर दरवेळी अनेकांच्या टोकच्या प्रतिक्रिया उमटतात. मात्र या विषयावर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे काय विचार आहेत याबद्दल सुसंवाद व्हायला हवा, असं मत भागवत यांनी मांडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)