नवी दिल्ली – दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचार घेत असलेले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना डेंग्यु झाल्याचे निदान करण्यात आले आहे. तथापि त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. 89 वर्षीय मनमोहनसिंग यांना बुधवारी रात्री एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरातील प्लेटलेट चे प्रमाण वाढत असून त्यांची प्रकृती आता सुधारत आहे असे एम्सच्या सूत्रांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरूवारी रात्री रूग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान मंडाविया यांनी मनमोहनसिंग यांच्या बरोबर तेथे फोटो काढून तो प्रसिद्ध केल्याने एक नवीन वाद निर्माण झाला आहे. मनमोहनसिंग यांच्या कन्या दमन सिंग यांनी म्हटले आहे की आरोग्यमंत्र्यांनी आमच्या इच्छेच्या विरूद्ध जाऊन तेथे हे फोटो घेतले. मनमोहनसिंग यांच्या पत्नीने मंडाविया यांच्या सोबत आलेल्या फोटोग्राफरला खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितले पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे त्यांच्या मुलीने पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, एम्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांच्या निधनाचे वृत्त खोटे आहे.