शेवगाव (प्रतिनिधी) – शेवगांव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळावर निवड करण्यात आली.
डॉ. क्षितिज घुले यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रलंबित असलेला विकास भरून काढण्याचे काम हाती घेतले. निराधारांना घराचा तर अपंगाना काठीचा आधार देण्याचे काम केले. गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यानी प्राथमिक शाळेसाठी खोल्या, विद्यार्थ्याना प्रोत्साहनपर बक्षिसे, पाण्यासाठी हापसे, पाण्याच्या टाक्या, गावांतर्गत रस्ते, दलित वस्ती सुधार योजनेतील रस्ते, भुजल पातळी वाढविण्यासाठी तलाव, बंधाऱ्याची निर्मिती, जैविक शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी शेवगांव येथे बिजमाता राहीबाई पोपरे यांचे व्याख्यान, ग्रामपंचायतीला सात लाखापर्यंत जिमचे साहित्य तसेच करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने हातवर पोट भरणाऱ्यांना किराणा किटचे वाटप केले असुन या संकटात महत्वाची भुमिका पार पाडणारे डॉक्टर्स, पोलिस कर्मचारी, सिस्टर, आरोग्य सेवक आदिंना सॉनिटायझर्स आणि मास्कचे वाटप करून त्याना आधार देण्याचे काम केले आहे. डॉ. क्षितिज घुले यांनी वडील माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, काका चंद्रशेखर घुले पाटील यांचा वसा जोपासला आहे.
या सर्व कामाची दखल घेत भारत सरकारच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अहमदनगर येथील कार्यालयाने डॉ. क्षितिज घुले यांची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळावर नियुक्ती केली असल्याने त्यांचे आभिनंदन केले जात आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास यावर ही यंत्रणा काम करत असल्याने या पदाच्या माध्यमातून याठिकाणी घेतल्या जाणाऱ्या नवनवीन योजनाचा ग्रामीण भागात कसा उपयोग करता येईल, असे प्रयत्न तसेच विकासासंदर्भातील विचार ग्रामीण भागात पोहचवण्याचे व रुजवण्याचे काम या माध्यमातून करण्यात येईल.
डॉ. क्षितिज घुले ,सभापती, पंचायत समिती शेवगांव.