विविधा: डॉ. कमल रणदिवे

माधव विद्वांस

भारतात प्रथमच कर्करोग संशोधनाची सुरुवात करणाऱ्या डॉ. कमल रणदिवे यांचे आज पुण्यस्मरण. (निधन 11 एप्रिल 2001) त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1917 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुणे येथील हुजूरपागा शाळेत झाले. वर्ष 1934 मध्ये त्या पदवी परीक्षा विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. पुण्यातच त्यांचे एम.एस्सी.पर्यंतचे शिक्षण झाले. त्यांचे वडील दिनकर दत्तात्रेय समर्थ हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. ते फर्गसन महाविद्यालयात प्राध्यापक होते व आपल्या मुलीलाही शिकवत होते. त्यांनी त्यांच्यात असलेली बुद्धिमत्ता ओळखली होती. त्यांनी डॉक्‍टर व्हावे असे त्यांना वाटत असे. त्यांचा विवाह प्रसिद्ध गणिती जे. टी. रणदिवे यांच्याबरोबर झाला, त्यांनी आपल्या पत्नीला खूप सहकार्य व उत्तेजन दिले.

विवाहानंतर त्या मुंबई येथे स्थायिक झाल्या. त्यानंतर त्यांनी पॅथॉलॉजिस्ट व्ही. आर. खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली “इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर’ या प्रयोगशाळेत पीएच.डी.चा अभ्यास केला. अधिक संशोधनासाठी व शिक्षणासाठी रणदिवे अमेरिकेला गेल्या. त्यांनी अमेरिकेत गेल्यावर बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये जॉर्ज गे यांच्याबरोबर “हेला’ नावाच्या पेशींवर संशोधन केले. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी पीएच.डी.नंतर भारतात परतले पाहिजे व स्वदेशात अधिकाधिक संशोधन करून देशाला त्याचा लाभ करून दिला पाहिजे, असं त्यांच ठाम मत होतं. देशातील तळागाळातल्या स्त्रिया व मुले यांच्या उन्नतीसाठी शास्त्रज्ञांनी काम केले पाहिजे, असे त्यांना मनापासून वाटे.

इ.स. 1960 मध्ये त्या भारतात परत आल्या.त्यानंतर भारतातील पहिले पेशी संशोधन केंद्र असलेल्या “इंडियन कॅन्सर संशोधन’ केंद्रात संशोधन सुरू केले. त्यांनी प्राणिशास्त्र आणि रसायनशास्त्र यात काम करणाऱ्या डॉक्‍टरेटच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने “कॅन्सर संशोधन केंद्र’ या संस्थेचे “भारतीय कॅन्सर संशोधन संस्था’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेत रूपांतर घडवले. या संस्थेमध्ये कॅन्सरचा कार्यकारणभाव, कॅन्सरच्या पेशींचा जीवनक्रम आणि कॅन्सरपासून अभय अशा तीन नवीन उपशाखा विकसित करण्यात आल्या. एखाद्या व्यक्तीची (प्राण्याची) कॅन्सर होण्याची प्रवृत्ती आणि त्याच्या शरीरात स्रावणारे हार्मोन्स व ट्यूमर व्हायरस यांचा परस्पर संबंध शोधून उंदरावर प्रयोग करून तो पटवून देणाऱ्या त्या पहिल्या संशोधक ठरल्या.

या संशोधनाचा उपयोग रक्‍ताचा (पांढऱ्या रक्‍तपेशी) कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि घशाचा कर्करोग यांच्या अभ्यासास उपयुक्‍त ठरला. त्यांचे याचबरोबर महारोगाच्या जंतूवरही संशोधनाचे काम चालूच होते. त्याचा उपयोग महारोगावरील लस (लेप्रसी व्हॅक्‍सीन) निर्माण करण्यास उपयोगी ठरला.स्त्री शास्त्रज्ञांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून त्यांनी “इक्‍सा’ (इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन) ही संस्था स्थापन केली. त्यांनी 200चे वर शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांनी वर्ष 1989 मधे अहमदनगरच्या सत्य निकेतन (स्वयंसेवी संघटना) या संस्थेच्या सहकार्याने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील आदिवासी मुलांच्या कुपोषणासंबंधी माहिती गोळा केली होती. त्यांच्या संशोधन कार्याबद्दल वर्ष 1982 मधे पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.