विशेष : विज्ञानकथा लोकप्रिय करणाऱ्या लेखकाचा सन्मान

-श्रीनिवास वारूंजीकर

डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांची नाशिक येथे यावर्षी व्हावयाच्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मराठीमधील दुर्लक्षित अशा “विज्ञानकथा’ या साहित्यप्रकाराचा हा सन्मान असून डॉ. नारळीकरांच्या रूपाने एक बुद्धीवादी, विचारशील असा साहित्यिक संमेलनाचा अध्यक्ष होणे ही लक्षणीय घटना आहे. 

मूळचे कोल्हापूर येथील असलेले आणि विख्यात गणितज्ज्ञ, रॅंग्लर विष्णू नारळीकर यांचे सुपुत्र असलेले डॉ. जयंत नारळीकर यांनीही रॅंग्लर ही गणितातली सर्वोच्च श्रेणी संपादन केली आहेच. याशिवाय ब्रिटीश शास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्यासमवेत डॉ. नारळीकर यांनी केलेले गुरुत्त्वाशक्‍तीबाबतचे संशोधन विज्ञान क्षेत्रात “हॉयल-नारळीकर सिद्धांत’ म्हणून प्रसिद्ध आहे.

एका विज्ञान संमेलनात, आपली पहिली विज्ञानकथा “कृष्णविवर’ लिहीत, मराठी विज्ञान परिषदेचे पारितोषिक मिळवण्यापासून डॉ. नारळीकरांची साहित्यविश्‍वात भ्रमंती सुरू झाली. विज्ञानकथा लिहिताना, थरार अथवा भयपटांसारखे रहस्य न सांगता, वैज्ञानिक तथ्य आणि वास्तवाला धरून असलेले कथानक लिहिण्याविषयी आग्रही असलेल्या नारळीकरांनी मराठी साहित्य विश्‍वात घातलेली भर मोलाची अशीच आहे.

कृष्णविवरांचे संशोधन आणि त्यामागील काळाच्या सापेक्षतेचे रूप रंजक अशा कथेमधून उलगडत त्यांनी ज्या प्रकारे मांडले आहे, ती संपूर्ण भाषाशैली आणि कथेचा पट हा वाचकाला स्तिमित करणारा ठरतो. त्यांच्या अशा विविधांगी कथांनी सजलेल्या “यक्षांची देणगी’ या कथासंग्रहाला राज्य शासनाच्या पुरस्कारासह अनेक मानसन्मानही लाभले आहेत. “प्रेषित’, “वामन परत न आला’, “व्हायरस’ आणि “अंतराळातील भस्मासूर’ अशा त्यांच्या कथा आणि लघु कादंबऱ्यांनी मराठी साहित्यविश्‍व समृद्ध तर झाले आहेच; शिवाय त्यांच्या या लेखनातून प्रेरणा घेत अनेक विज्ञानकथा लेखक घडलेही आहेत.

“टाइम मशीनची किमया’ या त्यांच्या पुस्तकामध्ये बहुचर्चित अशा टाइम मशीनविषयीच्या रूढ संकल्पना आणि वैज्ञानिक वास्तव याविषयी प्रकाश टाकण्यात आला आहे. “आकाशाशी जडले नाते…’ आणि “नभात हसरे तारे’ ही त्यांची मराठीमधील खगोलशास्त्रावरची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. तसेच इंग्लिशमध्ये “द कॉमेट’, “द रिटर्न ऑफ ऍडव्हेन्चर’ आणि “रिटर्न ऑफ वामन’ ही पुस्तकेही लोकप्रिय आहेत. पद्मभूषण (1965) आणि पद्मविभूषण (2004) या पुरस्कारांसह त्यांच्या “चार नगरांतील माझे विश्‍व’ या आत्मपर लेखनाला साहित्य अकादमीचा (2014) सन्मानही लाभला आहे.

एका बुद्धीजीवी आणि मूलभूत संशोधनाला वाहून घेतलेल्या ऋषितूल्य साहित्यिकाला संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान जाहीर केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अभिनंदनास पात्र आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.