सातारा – सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून डॉ. सुरेश जाधव यांची आज नियुक्ती करण्यात आली. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेनुसार डॉ. सुरेश सर्जेराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सातारा जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दीर्घकाळापासून रिक्त होते. लवकरच जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती होईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. डॉ. सुरेश जाधव कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून यापूर्वी खटाव विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवली होती. पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर विधायक कामे केली आहेत.
कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणार
गेल्या काही वर्षात पक्षात आलेली मरगळ दूर झटकून नव्याने संघटन करून कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणार, असा विश्वास कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यावेळी व्यक्त केला. सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणारा जिल्हा म्हणून देशभरात प्रसिध्द आहे. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात कॉंग्रेसचे वारू दौडात होते; पण नंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले.
परंतु, आता झालेगेले विसरून परत एकदा यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असे कार्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली साध्य करून दाखवू, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. आता मी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून प्रत्येक तालुक्याचा आढावा घेणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी वर्ग, गरजूंना विविध योजनांच्या माध्यमातून सार्वजनिक विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या दोन वर्षात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले.