नगर -महापालिका महिला कर्मचाऱ्याच्या मुलास मारहाण करत त्यांच्या घरात बळजबरी मद्यपान करणाऱ्या महापालिका आरोग्याधिकारी अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे या तिघांनाही तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, डॉ. बोरगे, मिसाळ व घाटविसावे यांच्यासह त्या अल्पवीन मुलाच्या त्रासाला कारणीभूत असलेल्या तिच्या आईवरही करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन केल्याचा गुन्हाही तातडीने दाखल करण्यात यावा, अशी मागणी बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे. वरिल अधिकाऱ्यांविरुद्ध आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी स्वत: तक्रार अर्ज द्यायला हवा, अशी भूमिका बोराटे यांनी स्पष्ट केली आहे.
महापालिकेच्या सेवेत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या अल्पवयीन मुलास जीवे मारण्याचा प्रयत्न करुन डाव्या हाताला सिगारेटचे चटके दिल्याच्या आरोपावरुन काल चौघाजणांविरुद्ध तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलो आहे. तथापि, अजून कुणालाही या प्रकरणी अटक करण्यात आलेली नाही.
महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांच्या घरी या संशयित आरोपींचे गेल्या एक ते दोन वर्षांपासून जाणे-येणे होते. त्यातून 13 जूनला रात्री हे संशयित आरोपी “त्या’ महिलेच्या घरी रात्री उशिरा दारू घेऊन पोचले होते. त्यांचा आरडाओरडा ऐकून यातील कथित मुलगा जागा झाला व पुढील घटनाक्रम घडला.
वास्तविक चार जणांच्या जेवणाची ताटे व चार बाटल्या दारु आणून पार्टी करत त्यांनी करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महापालिकेतर्फे स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची गरज आहे, अशी भूमिका बोराटे यांनी घेतली आहे.
तोफखाना पोलिसांनी चाईल्ड लाईनने दिलेल्या फिर्यादीवरुन अगोदरच भादवि कलम 324, 504, 506 व 34 तसेच बाल अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यात करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल होण्याची आता गरज आहे, अशी भूमिका बोराटे यांनी स्पष्ट केली आहे.
शिवसेनेने अलिकडेच चीनचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले होत. सामाजिक आंदोलनात सहभागी होऊन करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते व नगरसेकांवर गुन्हा दाखल करण्याची हिंमत पोलिसांनी घेतली. त्यामुळे आता दारुपार्टी करणाऱ्यावर गुन्हा दाखल न करण्याचे प्रयोजन काय? असा सवाल बोराटे यांनी उपस्थित केला आहे.