पाथर्डी –महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आ. मोनीका राजळे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी शहरातून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निवडणूक प्रचारात पाथर्डी तालुक्यातून डॉ. विखे पाटील यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराच्या सुरुवातीलाच डॉ. विखे पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला होता. ना. मुंडे यांनी डॉ. विखे पाटील माझे भाऊ आहेत त्यांना प्रचंड मतांनी निवडुन देण्याचे भावनिक आवाहन केले होते. या प्रचाराच्या पहिल्याच सभेत ना. मुंडे आणि डॉ. विखे पाटील यांनी थेट राष्ट्रवादीवर निशाणा साधून निवडणुकीतील वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आ. राजळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि वाड्या वस्त्यांवर जावुन मतदारांशी संपर्क साधला साधून निवडणुकीतील भूमिका स्पष्ट केली आहे.
तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नावर निर्णायक भूमिका घेण्यासाठी माझी उमेदवारी आहे. हा प्रश्न युती सरकारच्या माध्यमातून सुटू शकतो, असा आशावाद ठिकठिकाणी झालेल्या सभांमधून डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पदयात्रेच्या निमित्ताने आ. राजळे आणि डॉ. विखे पाटील यांनी समाजातील विविध घटकांच्या भेटीगाठी घेऊन महायुतीला पाठबळ देण्याचे आवाहन केले आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शेवगाव, पाथर्डी या मतदार संघात पुन्हा ना. मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.