डॉ. विखेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मंगळवारी नगर तालुक्‍यात

साकळाई पाणीयोजनेच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधणार- डॉ.विखे

नगर: महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि. 16 रोजी दुपारी 3 वाजता नगर तालुक्‍यातील वाळकी येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने साकळाई पाणीयोजनेच्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

ना. फडणवीस यांच्या जाहीर सभेच्या प्रचार नियोजनाची बैठक माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस दिलीपराव भालसिंग, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, राजेंद्र भगत, दिपक कार्ले, योगिराज गाडेकर, रवींद्र कडुस, रवींद्र भापकर, शरदराव बोठे, रमाकांत बोठे, प्रविण कोकाटे, मनोज कोकाटे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.विखे पाटील म्हणाले, वाळकीत मुख्यमंत्र्यांची सभा महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण तालुक्‍याचे भवितव्य अवलंबुन असलेल्या साकळाई पाणी योजनेचा प्रश्‍न गेली अनेक दिवस प्रलंबित आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून या योजनेतील अडथळा त्यांच्या निदर्शनास आणुन दिले होते. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी साकळाई पाणीयोजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. पण आमचे समोरचे उमेदवार साकळाई योजना पुर्णपणे मार्गी लागली असुन, यावर आता फक्त मुख्यमंत्र्यांची सही बाकी असे सांगत आहेत. नेमकी वस्तुस्थिती महायुतीच्या कार्यकर्त्यांसह या तालुक्‍यातील सामान्य माणसाला कळली पाहीजे आणि मुख्यमंत्र्यांनीच साकळाई योजनेबाबत तालुक्‍यात येवून भाष्य करावे,असा आग्रह आपला होता. मुख्यमंत्र्यांनी सभेस येण्याचे मान्य केल्यामुळे साकळाई योजनेचा सोक्षमोक्ष होईल असा विश्वास डॉ.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पाचपुते म्हणाले, निवडणुकीच्या निमित्ताने या भागाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची मोठी संधी आहे. श्रीगोंदा तालुक्‍याची औद्योगिक वसाहत असेल किंवा या भागाच्या प्रलंबित पाणी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सभेची जोरदार तयारी महायुतीच्या वतीने करण्यात येत असुन, यासाठी महायुतीचे कार्यकर्ते सक्रीयतेने कार्यरत झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.