डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणी तिघांविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई- डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तीन डॉक्‍टरांविरोधात आरोपपत्र दाखल करत त्यांच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेने 2 हजार पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान, या तिन्ही डॉक्‍टरांच्या जामीन अर्जावरील सुनावणीही 25 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पायल तडवी या 23 वर्षीय विद्यार्थिनीने या तिफ्घींकडून होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी महाविद्यालयात वरिष्ठ असलेल्या डॉक्‍टर हेमा अहुजा, डॉ. भक्ति मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात ऍट्रॉसिटी आणि रॅगिंगविरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डॉ. पायल हिने या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून या तिघींनी त्यांचा छळ सुरू केला होता. या तिघींकडून होणारा जाच पायलने अनेकदा पालकांना, पतीला सांगितला होता. त्याविरोधात रुग्णालयाचे अधिष्ठाते, वसतिगृहाच्या वॉर्डन आणि व्याख्यात्यांकडे लेखी तसेच तोंडी तक्रारीही केल्या होत्या. मात्र, त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती यापूर्वी पोलिसांकडून देण्यात आली होती. तिच्या आईच्या तक्रारीवरून या प्रकरणी ऍट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.