विविधा: डॉ. बाळकृष्ण मुंजे

माधव विद्वांस
भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे व निष्णात नेत्रविशारद धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांची आज जयंती. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1872 मध्ये छत्तीसगडमधील विलासपूर येथे झाला. ते तात्या नावाने त्यांच्या निकटवर्तीयामध्ये ओळखले जायचे. तात्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण बिलासपूरमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी रायपूरला पूर्ण केले. मॅट्रिक परीक्षेच्या वेळेस त्यांचा विवाह कृष्णाबाई पारधी यांच्याशी झाला.

वर्ष 1890 मध्ये तात्या मॅट्रिक झाले आणि त्याचवेळी त्यांचे वडील नोकरीवरून निवृत्त झाले. त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. अशा परिस्थितीत मिळालेली पंधरा रुपयांची शिष्यवृत्ती व शिकवण्या करून ते महाविद्यालयीन शिक्षण व घर सांभाळू लागले. ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व विशेषतः संस्कृत विषयात प्रवीण होते. त्यांनी बायबल ग्रंथ संपूर्ण अभ्यासला होता. त्यातून त्यांनी मानवतावाद हा विषय समजून घेतला. सत्य आणि मानवता हाच धर्म आहे याच विचाराचे ते पुरस्कर्ते होते. संस्कृत विषयावर तर त्यांचे नितांत प्रेम होते. त्यांनी काही इंग्रजी कविता संस्कृतमध्ये भाषांतरित केल्या.

मुलाने वकील व्हावे असा वडिलांचा आग्रह होता. परंतु त्यांना वैद्यकीय क्षेत्राची आवड होती त्यामुळे घरी कुणालाही न सांगता मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. डॉक्‍टर झाल्यावर त्यांनी प्लेग प्रतिबंधक खात्यात नोकरी केली. दक्षिण आफ्रिकेतील युद्धातील जखमींवर उपचार करण्यासाठी ते द. आफ्रिकेत गेले. यावेळी त्यांचा मुक्‍काम म. गांधी यांच्याकडेच होता. तेथून परत आल्यावर नागपूरला त्यांनी दवाखाना सुरू केला. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेवर संशोधन करून “नेत्रचिकित्सा’ हा ग्रंथ लिहिला.

समाजकार्य चालू असतानाच त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. नागपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 1920 ते 1929 मध्ये राष्ट्रीय सभेत असताना नागपूर प्रांताचे राष्ट्र सभेचे ते अध्यक्ष झाले. 1930 व 1931ला लंडन येथे झालेल्या दोन्ही गोलमेज परिषदेला तात्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. मात्र कॉंग्रेसमध्ये पुढे वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी हिदू महासभेचे काम सुरू केले व अध्यक्षपदही भूषविले. अस्पृश्‍यता विरोधात त्यांनी समाज प्रबोधन केले. हिंदुस्थानातील तरुण आधुनिक युद्ध शास्त्रात प्रवीण झाला पाहिजे याचा त्यांनी ध्यास घेतला होता. यासाठी त्यांनी जर्मनी, इटली इ. देशातील सैनिकी शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मुसोलोनीचीही भेट घेतली होती. सैनिकी शाळा स्थापनेचा सर्वांगीण अभ्यास करून 1936 मध्ये त्यांनी नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना केली. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रथमच मुलींसाठीही लष्करी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यांचे 3 मार्च 1948 रोजी नाशिक येथे निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.