बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण करणं शक्य – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या आराखड्याची माहिती घेण्यासाठी इंदू मिलला भेट दिली. यावेळी पवार यांच्यासोबत पक्षाचे जेष्ठ नेते नवाब मलिक व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. स्मारकाच्या आराखड्याची  माहिती घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं.

दोन वर्षांमध्ये काम पूर्ण होणं शक्य; कंत्राटदारांना सूचना

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण केले जाऊ शकते असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी स्मारकाशी संबंधित असलेल्या कंत्राटदारांनी आता यापुढे स्मारक उभारणीस विलंब होणार याची दक्षता घ्यावी असं देखील सूचित केलं.

…मात्र स्मारकं झालीच पाहिजेत

प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला द्यावा अशी मागणी केली होती. याबाबत प्रश्न विचारला शरद पवार यांनी, ‘वाडिया रुग्णालयाला त्यांचा निधी मिळेल. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन तरतूद देखील केली आहे मात्र महापुरुषांची स्मारकं झाली पाहिजेत’ असं उत्तर दिलं.

महापरिनिर्वाणदिन व आंबेडकर जयंतीदिनी विशेष काळजी घेणं गरजेचं

‘महापरिनिर्वाणदिन व आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती स्मारकाची उभारणी झाल्यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते त्यामुळे ६ डिसेंबर व १४ एप्रिल या दिवशी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.’ असं मत पवारांनी व्यक्त केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.