मुळा-प्रवरा विद्युत सोसायटीच्या घोटाळ्याबाबत खोटा संदेश
राहाता – मुळा प्रवरा विद्युत सोसायटीबाबत समाज माध्यमांमध्ये 1 हजार 400 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला असल्याचा खोटा संदेश प्रसारित केल्याच्या कारणावरुन संस्थेचे संचालक देविचंद तांबे यांनी डॉ. अशोक विखे पाटील यांना कायदेशिर नोटीस पाठविली आहे. या संदेशाव्दारे संस्थेची बदनामी केल्याच्या कारणावरुन लेखी माफी मागावी, अशी कायदेशिर नोटीस पाठविण्यात आली.
समाज माध्यमांमध्ये डॉ. अशोक विखे पाटील यांनी संस्थेच्या सदंर्भात पाठविलेल्या संदेशामध्ये संस्थेचे विद्यमान संचालक म्हणून देविचंद तांबे यांची बदनामी झाली असल्याचा उल्लेख दिलेल्या नोटीसमध्ये करण्यात आला असून, नोटीसीत म्हटले आहे की, सोसायटीबाबत प्रसिध्द केलेला संदेश हा संपूर्ण खोटा व दिशाभूल करणारा आहे. यातून चारित्र्यहनन झाले असून, सोसायटीच्या कार्यक्षेत्रामध्ये बदनामी झाली आहे.
सोसायटीबाबत अनेक खटले वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित असतानाही त्याचे अवलोकन न करता जाणुन बुजून गैरहेतूने बदनामीकारक व चारित्र्यहनन करणारा संदेश प्रसारित केल्याचे दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने प्रेरित होवून हा संदेश प्रसिध्द केलेला आहे. याबाबत लेखी माफीनामा मागावा अन्यथा फौजदारी कारवाई करण्याबाबत नोटीसीत
म्हटले आहे.