डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत घोटाळा

आहार न देता कागदोपत्री खर्च दाखवून काढली बिले

नगर – महिला व बालकल्याण विभागामार्फत आदिवासी भागासाठी महत्वकांक्षी अशी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अकोले तालुक्‍यात राबविण्यात येत आहे. परंतू गेल्या काही महिन्यांपासून ही योजना कागदावरच राबविण्यात येत असून स्तनदा माता, गरोदर माता व सहा वर्षापर्यंतच्या बालकांना आहार न देताच तो दिल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. याबाबत वाकचौरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अकोले तालुक्‍यात आदिवासी भागातील स्तनदा माता, गरोदर माता याच्यासह 7 महिने ते 6 वर्षपर्यंतच्या बालकांसाठी ही योजना राबविण्यात येते. स्तनदा माता, गरोदर माता यांना दररोज जेवण व सहा वर्षापर्यंतच्या बालकांना केळी व अंडीचा पुरवठा करण्यात येतो. या योजनेसाठी एक कोटी 21 लाख रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. प्रत्यक्षात स्तनदा माता, गरोदर माता व सहा वर्षापर्यंत बालकांना आहार न देताच केवळ कागदे रंगविण्यात येत आहे.

कागदोपत्रीत या योजनेचा खर्च दाखविण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेत आर्थिक घोटाळा झाला असून लाभार्थ्यांना आहार मिळाला की नाही याची शहानिशा करून संबंधित अधिकाऱ्यांसह पुरवठादारावर कारवाई करण्यात यावी. या बाबत खातेनिहाय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाकचौरे यांनी मुख्या कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

तालुक्‍यात 11 गट असून 312 अंगणवाड्या आहेत. त्यात 273 नियमित व 39 मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. त्यापैकी 144 अंगणवाड्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. गरोदर माता 437, स्मनदा माता 438 असे एकूण 875 लाभार्थी आहेत. तर सहा वर्षापर्यंत बालकांची संख्या 5 हजार 432 असून त्यापैकी 4 हजार 53 बालकांना आहार वाटप करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. परंतू प्रत्यक्षात लाभार्थ्यांना आहार वाटप होत नसल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)