नवी दिल्ली – भारतासाठी करोना विषाणू संसर्गाची लाट अधिक धोकादायक ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. या लाटेमध्ये विषाणू संसर्गाचा वेग प्रचंड वाढल्याने रुग्णसंख्याही झपाट्याने वाढली. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्थेवर ताण आला व ठिकठिकाणी ऑक्सिजन, बेड्स, रेमडीसीवीर यांचा तुटवडा भासू लागला. अनेक ठिकाणी उपचारांअभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.
देशातील करोना महासाथीच्या या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स व आरोग्यकर्मी अहोरात्र झटत आहेत. मात्र करोनाचा हा विषाणू त्यांच्यासाठीही जीवघेणा ठरतोय. दुसऱ्या लाटेमध्ये आतापर्यंत ४२० डॉक्टर्सना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीतील २६ वर्षीय डॉक्टर अनस मुजाहिद यांनाही करोनामुळे आपला जीव गमवावा लागला होता.
आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डॉ. अनस यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्याकडे एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी बोलताना डॉक्टर अनस यांच्या वडिलांनी, “माझ्या मुलाचा कर्तव्यावर असताना, लोकांची सेवा करताना मृत्यू झाला. मी आशा करतो की, माझ्या इतर मुलांच्या हातूनही देशसेवा घडो.”
दरम्यान, डॉ. अनस यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर काही तासांमध्येच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने दिलेल्या अहवालामध्ये त्यांना करोना विषाणूची बाधा झाली होती तसेच त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होत.
Delhi CM Arvind Kejriwal meets the family of 26-year-old Dr Anas, a doctor who succumbed to #COVID19, and hands over a cheque of Rs 1 Crore to them
My son was on duty & serving people when he lost his life. I hope my other children may also serve our nation, says Dr Anas’ Father pic.twitter.com/PlQBeSTyXe
— ANI (@ANI) May 22, 2021