– शिवनेरी व लेण्याद्री येथे रोप वे उभारण्याची देखील केली मागणी
- या संदर्भात लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पुरातत्त्व विभागाची विशेष बैठक
जुन्नर – स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर १०० फुटी भगवा ध्वज लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. तसेच शिवनेरी व लेण्याद्री येथे रोप वे उभारण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे (Archaeological Survey of India) अधिकारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत विशेष संयुक्त बैठक घेऊन निर्देश दिले जातील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी दिले.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशन काळात मतदारसंघातील विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी गुरुवारी (दि. ५ ऑगस्ट रोजी) केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली. या भेटीत लेण्याद्री व शिवनेरी गडावर जाण्यासाठी रोप वे उभारणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून जुन्नर तालुका विकसित करणे, भक्ती-शक्ती कॉरिडॉर अशा विविध प्रकल्पांसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
त्या अनुषंगाने शिवनेरी किल्ला, लेण्याद्री डोंगरावरील बौद्ध लेणी समूह, अष्टविनायक गणपती, धरणांची साखळी, विलोभनीय सृष्टी सौंदर्याने नटलेला मतदारसंघातील परिसरातील पर्यटन विकासाची संधी आदींची माहिती डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री रेड्डी यांना दिली.
त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज नसल्याकडे केंद्रीय मंत्री रेड्डी यांचे लक्ष वेधून १०० फुटी भगवा ध्वज उभारण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश पुरातत्व विभागाला देण्याची आग्रही मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्र्यांनी त्याबाबत तात्काळ सूचना देण्याचे मान्य केले.
खा डॉ. कोल्हे यांनी नुकतीच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीत शिवनेरी किल्ला व लेण्याद्री डोंगरावर रोपवे बांधण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सीआरएफ मधून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. ही बाब निदर्शनास आणून त्यासाठी देखील पुरातत्व विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी केली. त्यावर मंत्री रेड्डी यांनी या विषयी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या समवेत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर रोपवेचा डीपीआर महाराष्ट्र सरकारकडून तयार झाल्यास याबाबतची कार्यवाही सुलभ होईल असे सांगितले.
भक्ती शक्ती कॉरीडॉरची संकल्पना होणार साकार….
शिरूर लोकसभा मतदारसंघातील भक्ती-शक्ती कॉरिडॉरची संकल्पना केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना आवडली असून शिवनेरी, वढु बुद्रूक,तुळापूर सारखी ऐतिहासिक स्थळे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या तिर्थक्षेत्र श्री भीमाशंकर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव व थेऊर येथील अष्टविनायक गणपती, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असलेले श्री तिर्थक्षेत्र आळंदी, निमगाव खंडोबा अशा भक्ती स्थळांचे कॉरिडॉर तयार केल्यास पर्यटनासाठी मोठी संधी असल्याचे मत केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केले.
शिवनेरी गडावर दिमाखाने व डौलाने हिंदवी स्वराज्याचा १०० फुटी भगवा ध्वज फडकणार : खा.डॉ.अमोल कोल्हे
अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी गडावर जातो, पण तिथे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज लावलेला नाही याची कायमच एक बोच, एक खंत मनाला जाणवत होती. त्यामुळे शिवनेरी गडावर १०० फुटी भगवा ध्वज लावावा अशी माझ्यासह राज्यातील सर्वच शिवभक्तांची मनोमन इच्छा व मागणी होती.
त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू होते असे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, हा भगवा ध्वज उभारण्यासाठी भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाची परवानगी आवश्यक असल्याने आज केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन या प्रश्नाची तड लावण्याचे ठरवले होते.
केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आता लवकरच पुरातत्व विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळेल अशी अपेक्षा आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त होताच शिवनेरी गडावर दिमाखाने व डौलाने हिंदवी स्वराज्याचा १०० फुटी भगवा ध्वज निश्चितपणे फडकणार असा आत्मविश्वास डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.