डॉ. श्रीराम लागू यांना सर्व स्तरांतून श्रद्धांजली

पुणे  – ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी (19 डिसेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान,त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत.

डॉ. श्रीराम लागू हे आपल्यातून जातील, असे वाटले नव्हते. आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभिनय त्यांनी केला. आम्ही खूप भाग्यवान आहोत, डॉ. लागू यांचा अभिनय आम्ही पाहू शकलो. ते नुसते नट नव्हते तर वैचारिक भूमिका त्यांनी मांडल्या. त्यांचे भरपूर वाचन होते. डॉ. लागू हे सामाजिक भान असणारे कलाकार होते. डॉ. लागू यांची शिस्त आणि नियमितपणा हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. ते आमचे आदर्श व दैवत होते. नव्या कलाकारांना आणि संस्थांना नेहमी प्रोत्साहित करायचे. अनेक संस्थांना त्यांनी आर्थिक पाठबळ दिले. ते अनेकांचे आधार होते.
– दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते.

रंगभूमीवर असा हा अतिशय बुद्धीमान नट असणे ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. खूप कमी वेळा असे नट रंगभूमीला मिळतात. केवळ भूमिका न करता, आपल्या वाटेला आलेल्या भूमिकेला तार्किकतेची जोड असल्याशिवाय आणि बुद्धीमत्तेचे निकष लावून विश्‍लेषणात्मक करून ती तालमीत पक्की करायची आणि त्यानंतर ती रंगभूमीवर उभी करायची ही गोष्ट अतिशय अपवादात्मक आहे. आणि तो अपवाद म्हणजे श्रीराम लागू आहेत. रंगभूमीला पडलेले ते एक सुरेख स्वप्न होते. हे स्वप्न रोमॅन्टिक नव्हते तर ते भारदस्त आणि डोक्‍याला भुंगा लावणारे, विचार करायला लावणारे असे होते. त्यांच्या भारदस्त आवाजात ऐकलेल्या कविता, स्वगत आजही आठवतात. माझी त्यांच्याशी पहिली भेट ही पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात आलो असतानाची आहे. त्यावेळी माझी त्यांची ओळख झाली.
– जब्बार पटेल, ज्येष्ठ सिने-नाट्य दिग्दर्शक

डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्याने आपण एक अत्यंत मोठा अभिनेता आणि तेवढाच मोठा माणूस गमावला आहे. नरेंद्र दाभोलकरांना अंनिसच्या कामासाठी अगदी सुरुवातीपासून त्यांचे खूप मोठे पाठबळ आणि सक्रिय सहभाग मिळाला. आपल्या विचारला जे पटेल त्यासाठी, निर्धाराने पडेल ती किंमत देऊन उभा राहायचा वसा त्यांनी आपल्या सर्वांना दिला आहे .त्यांच्या प्रखर बुद्धिवादी विचारांची कास धरणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
-डॉ. हमीद दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून येणार नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय पारदर्शक होत. त्यांनी आपल्या अभिनयातून नेहमी एक विचार मांडला. ते खऱ्या अर्थानं अभ्यासू आणि विचारी नट होते. सॉक्रेटिसनं वर्णन केल्याप्रमाणे ते ऍथलिट आणि तत्वज्ञ नट होते. डॉ. लागू यांनी नाटकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीही नेहमी लढा दिला. आणीबाणीच्या काळात त्यांनी स्वतः ‘अँटिगनी’सारखं नाटक केलं. ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाइंडर’सारख्या नाटकांवरून जेव्हा वाद निर्माण झाला होता, तेव्हा ते कलाकारांच्या आणि दिग्दर्शकांच्या पाठीशी उभे राहिले होते.
– सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार.

डॉ. श्रीराम लागू हे मोठे रंगकर्मी होते. ते सगळ्यांचे आदर्श होते. डॉ. लागू यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली
– सुबोध भावे, अभिनेता.

स्वतःच्या भूूमिकेचा, जीवनाचा आणि वास्तवाचा खोलकर विचार करणारा, त्याचा ताठ कण्याने भिडणारा माणूस आपल्यातून निघून गेला आहे. सूर्य पाहिलेल्या नटसम्राटाचा अस्त झाला आहे. डॉ. लागू यांच्याशी सूर्य पाहिलेला माणूस या नाटकाच्या निमित्ताने जवळून संबंध आला. त्यांच्या जाण्याने व्यक्तिगत हानी झाली असून नाट्यसृष्टीने नुकसान झाले आहे.
– मकरंद साठे, ज्येष्ठ नाटककार

डॉ. श्रीराम लागू यांना “सूर्य पाहिलेला माणूस’ म्हणता येईल. त्यांचे निधन ही प्रत्येकासाठी कल्पनेपलीकडील पोकळी आहे. त्यांनी रंगभूमीला खूप काही दिलं आहे. डॉ. लागू अभिनयाचे दैवत होते. आम्ही त्यांच्या बरोबर काम केले नव्हते, पण माझे शिक्षक विजय केंकरे यांच्या “मित्र’ या नाटकात त्यांना जवळून पाहता आलं. मधू कांबिकरांबरोबर ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम करायचो. तेव्हा ते पाहायला आले होते. तेव्हा त्यांनी दिलेली पाठीवरची थाप काल परवा दिल्यासारखी वाटते. त्यांनी मराठी रंगमंचाला खूप काही दिले आहे.
– विजय मिश्रा, अभिनेता.

मराठी रंगभूमीला व अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारे कलाकार आज आपल्यातून निघून गेले आहेत. अशा दिग्गज कलाकाराला आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो.
– सुभाष देसाई, सांस्कृतिक मंत्री

डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्याने आपण एक अष्टपैलू व्यक्ती महत्त्वाला मुकलो आहे. दिग्गज रंगकर्मी असलेले डॉ. लागू यांनी चित्रपट क्षेत्रातही आपला ठसा उमटवला.
– प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री.
ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन झाले. पुरोगामी चळवळीबद्दलची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. रंगभूमी, चित्रपट या क्षेत्रात त्यांचे अतुलनीय योगदान आहे.
– सुप्रिया सुळे, खासदार.

नाटकातल्या सारखीच हुकुमत डॉ. श्रीराम लागू यांनी पिंजरा चित्रपटात दाखवली आणि चित्रपट सृष्टीला एक सशक्त अभिनेता मिळाला. तेथून पुढे प्रवास सुरू झाला मराठी व हिंदी चित्रपटांचा. आपले वेगळे स्थान त्यांनी हिंदी चित्रपटातही निर्माण केले होते. नाटक संपल्यानंतर आपले नाइटचे पाकीट बॅंक स्टेज आर्टिस्टला देणारे डॉ. लागू हे एकमेव अभिनेते होते.
मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अ.भा. मराठी चित्रपट महामंडळ.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने आपण एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत. पुणेकर असलेले डॉ. लागू हे कलावंत म्हणून जितके मोठे होते, तितकेच ते माणूस म्हणूनही मोठे होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी शब्दशः भरुन निघणारी नाही. त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर मांडलेली भूमिका त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देणारी होती. तमाम पुणेकरांच्या वतीनं डॉ. लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्याने आज कदाचित मृत्यूही ओशाळला असेल. पण चाहत्यांच्या मनातील सिंहासनावर ते कायम आरुढ राहतील.
अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री.

गेली अनेक दशके चित्रपट, नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून मराठी व हिंदी रसिकांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय दु:खद आहे. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मूलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले.
– देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निधणारे नुकसान झाले आहे. पिंजरा, सामना यांसारखे चित्रपट आणि नटसम्राट, हिमालयाची सावली यांसारख्या अजरामर नाटकांमधून त्यांनी मराठी चित्रपट -नाट्यसृष्टी जिवंत केली.
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.

जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने आपण एका अत्यंत श्रेष्ठ अभिनेत्याला आणि पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तीला मुकलो आहोत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– जयंत पाटील, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र.

वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. श्रीराम लागू यांचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरो कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला आहे.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच! डॉ. श्रीराम लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. डॉ. लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवील.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.