वॉशिंग्टन – अमेरिकेतील निवडणूकीदरम्यान राज्यांच्या पातळीवर डझनभरापेक्षा अधिक भारतीयांनी विजय मिळवला आहे. त्यामध्ये 5 भारतीय महिलांचाही समावेश आहे. डॉ. अमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती हे चौघेजण अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवडून गेले आहेत. त्याव्यतिरिक्त या डझनभर प्रतिनिधींची वर्णी लागली आहे. आणखीन तिघांचे भवितव्य अद्यापही निश्चित व्हायचे आहे.
ज्या पाच महिला निवडून आल्या आहेत, त्यामध्ये जेनिफर राजकुमार या न्यूयॉर्क स्टेट हाऊसमध्ये, निमा कुलकर्णी या केंटुकी स्टेट हाऊसमध्ये, केशा राम या वेर्मोंट प्रांताच्या सिनेटमध्ये, वंदना स्लेटर या वॉशिंग्टन स्टेट हाऊसमध्ये आणि पद्मा कुप्पा या मिशीगन स्टेट हाऊसमध्ये निवडून गेल्या आहेत.
ओहायो स्टेट सिनेटसाठी नीरज अटानी यांना निवडण्यात आले आहे, तर जय चौधरी यांची उत्तर कॅरोलिना राज्य सिनेटवर फेरनिवड झाली आहे.
या व्यतिरिक्त अमिश शहा (अरिझोनिया), निखील सवल (पेनसिल्वेनिया), राजीव पुरी मिशीगनच्या स्टेट हाऊसमध्ये आणि जेरेमी कुनी न्यूयॉर्कच्या स्टेट सिनेटमध्ये निवडून गेल्या आहेत. कॅलिफोर्नियामध्ये ऍश कालरा यांची तिसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे. रवी शांडिल हे टेक्सासमधील डिस्ट्रीक्ट कोर्ट जजच्या निवडणूकीत निवडले गेले.
अमेरिकेच्या राजकारणामध्ये यंदाच्या निवडणूकीत भारतीयांनी मोठी झेप घेतली आहे, असे इंपॅक्ट फंडसच्या नील मखिजा यांनी सांगितले. अमेरिकेतील निवडणूकीत भारतीय उमेदवारांसाठी या संघटनेने 1 कोटी डॉलरचे निधी संकलन केले आहे.