भीती न उरली आता… (भाग-१)

विद्यमान महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी सादर केलेल्या लेखी माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत 27,771 महिलांच्या मृत्यूस हुंड्याची कुप्रथा कारणीभूत ठरली आहे. या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत कलम 304 ब अंतर्गत आठ लाखांहून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. हुंड्याच्या कुप्रथेमुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत उत्तर प्रदेश आघाडीवर असून, दुसऱ्या क्रमांकावर बिहार तर तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे. हुंड्यासारख्या कुप्रथेचा समूळ नायनाट करण्यासाठी तसेच घरगुती हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी अत्यंत कडक कायदे करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली आहे.

भारतात 15 ते 49 वर्षे वयोगटातील 33.5 टक्के महिला आणि मुलींनी कधी ना कधी कौटुंबिक हिंसाचाराचा सामना केलेला असतोच. गेल्या वर्षी 18.9 टक्के महिलांना हिंसेला सामोरे जावे लागले. भारतात हुंड्यासाठी होणारा छळ आणि मृत्यूंचे प्रमाण किती भयावह आहे, याचा अंदाज नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून सहज लक्षात येते. हुंड्याशी संबंधित हत्यांच्या प्रकरणांची टक्केवारी भारतात 40 ते 50 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. सर्वांत धोकादायक बाब म्हणजे 1999 ते 2016 या कालावधीत हेच प्रमाण सलगपणे दिसून आले आहे. तात्पर्य असे की, 1961 मध्ये सरकारने तयार केलेला हुंडाविरोधी कायदा निष्प्रभ ठरताना दिसतो आहे आणि देशात हुंडाबळींची संख्या वाढतेच आहे. हुंडा घेणे आणि देणे या दोन्ही गोष्टी 1961 च्या कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आल्या आहेत. विवाहाच्या वेळी वधुपित्याकडून वराच्या घरच्यांना जी संपत्ती दिली जाते, त्यास कायद्यान्वये हुंडा मानण्यात आले आहे. भारतात “वरदक्षिणा’ असेही नाव हुंड्याला देण्यात आले आहे.

भीती न उरली आता… (भाग-२)

आजच्या आधुनिक काळातही हुंड्याची दुष्प्रवृत्ती सर्वत्र मूळ धरून बसली आहे, हे दुर्दैवी म्हणावे लागेल. भारतातील मागास समाजांमध्ये तर ही समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करून बसली आहे. मुलीच्या वडिलांकडून मुलाच्या कुटुंबीयांना भेट म्हणून धन देण्याचा रिवाज भारतात प्राचीन काळापासून आहे. परंतु प्राचीन काळी भेटवस्तू किंवा धन देण्यासंबंधी वधुपित्यावर कोणतेही बंधन घातले जात नसे. वधू आणि वर अशा दोन्ही पक्षांकडील मंडळी वधुवरांना संसार उभारण्यासाठी स्वेच्छेने भेट देत असत. त्यावेळी हा रिवाज आजच्याइतका कुरूप झालेला नव्हता; परंतु नंतर राजेरजवाडे, जमीनदार आणि धनाड्य व्यक्तींनी या रिवाजाला हुंड्याचे नाव देऊन बेढब करून टाकले. जास्तीत जास्त हुंडा देणे आणि घेणे हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानले गेले. हळूहळू हीच प्रवृत्ती समाजाच्या अन्य वर्गांमध्येही पसरली आणि आता ही कुप्रथा महिलांच्या जीवावर उठली आहे. हुंड्याच्या प्रथेचे आजचे स्वरूप पाहिले असता लग्न म्हणजे एक सौदाच वाटू लागला आहे. वधुपक्ष वरपक्षाच्या मनाजोगा हुंडा देऊ शकत नाही, तेव्हा वरपक्षाकडून वधूवर अत्याचार करण्यास सुरुवात होते. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो. त्यामुळेच आजमितीस देशभरात तासाला एका महिलेचा मृत्यू या कुप्रथेपायी होताना दिसतो. हा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत जाणे धोकादायक आणि धक्कादायक आहे. 2007 ते 2011 या कालावधीत अशा प्रकारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते.

– प्रा. शुभांगी कुलकर्णी

Leave A Reply

Your email address will not be published.