भोपाळ – मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात हुंड्यासाठी आई-वडिलांकडून होणाऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वडिल, सावत्र आईला दोषी ठरवून तरूणाने आत्महत्या केली आहे.
माहितीनुसार, दमोह जिल्ह्यातील पथरिया विकासखंड येथील सुगाव येथे ही धक्कादायक घटना घडलीय. मृतकाचे दोन महिन्यांपूर्वी आनू गावातील एका मुलीशी लग्न झाले होते. मुलीच्या वडिलांनी दीड लाख रूपये खर्च करून लग्न करून दिले होते. शिवाय सव्वा लाख रुपये आणि गाडी देण्याची बोलणी केली होती. मात्र, काही कारणाने वेळेत पैसे आणि गाडी देणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुलीचा छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून पतीने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून त्यात आई-वडिलांना दोषी ठरवण्यात आले आहे. मुलीच्या घरच्यांनी दोषींविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, मृताच्या आई-वडिलांनी म्हटले आहे की, तो इंदोर येथे सीएचा कोर्स करत होता. तो डिप्रेशनमध्ये होता. लाॅकडाऊनकाळात अभ्यास न झाल्याने चिंताग्रस्त होता. कोणत्याही प्रकारे मुलीचा छळ केलेला नाही. पोलिसांनी दोन्ही पक्षांचे ऐकून घेत तपास सुरु केला आहे. शवविच्छेदनानंतर पुढली तपासला सुरुवात केली जाईल, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.