जुन्या काळात प्रेक्षकांवर आपल्या सौंदर्याची, अभिनयाची मोहिनी घातलेल्या अनेक नायिका सध्या छोट्या पडद्यावर झळकताना दिसत आहेत. साहजिकच वयानुसार त्यांना नायक-नायिकांच्या आईच्या वयाच्या भूमिका मिळत आहेत, पण तरीही त्या आनंदाने स्वीकारणाऱ्या अनेक नायिका-नायक आहेत.
अभिनेत्री अनिता राज ही यापैकीच एक. “प्रेमगीत’, “जरासी जिंदगी’, “नोकर बीवी का’ आणि “अंदरबाहर’ यांसारख्या चित्रपटांमुळे अनिता राजने एक काळ गाजवला होता, पण मध्यंतरी दीर्घकाळ ती ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब राहिली, पण मध्यंतरी तिने कमबॅक केले. सध्या ती कलर्स वाहिनीवरील “छोटी सरदारनी’ या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहे.
या मालिकेमध्ये तिच्यासोबत जग्गाची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता अमल सहरावत हा अनिताच्या कामावर आणि एकंदरीतच वागणुकीवर प्रचंड खुश आहे. अमल सांगतात की अनिता ही खूप वेगळ्या धाटणीची कलाकार आहे. त्याचबरोबरीने ती एक उत्तम माणूस आहे. त्यामुळेच मी माझ्या अभिनयातील मार्गदर्शनाखेरीज वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत त्यांचा सल्ला घेत असतो.
विशेष म्हणजे इतक्या मोठ्या कलाकार असूनही त्यांना अहंकाराचा लवलेशही नाही. सर्वांशी मैत्रीच्या नात्याने त्या वागत असतात. सहकलाकारांची काळजी घेणे, त्यांना चांगल्या सूचना देणे यामुळे सेटवर सर्वांनाच त्या हव्याहव्याशा वाटतात.