बीजिंग – भारत आणि चीनमधील विशेष प्रतिनिधींच्या चर्चेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनमध्ये दाखल झाले आहेत. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यदलांमध्ये गेल्या चार वर्षांपासून निर्माण झालेल्या कोंडीमुळे बिघडलेले द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरळीत करण्याच्या उद्देशाने ही चर्चा होणार आहे.
चीनचे विशेष प्रतिनिधी आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबरच्या चर्चेच्या २३ व्या फेरीमध्ये डोवाल सहभागी होणार आहेत. तसेच २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या सैन्य विलगीकरण आणि पूर्व लडाखमधील गस्तीबाबत द्विपक्षीय संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या मुद्यावर या चर्चेमध्ये भर दिला जाणार आहे.
दिनांक २४ ऑक्टोबर रोजी रशियामधील कझाक येथे ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातल्या समान समजुतीच्या अनुषंगाने वचनबद्धतेचा आदर राखला जाईल, असे चीनने म्हटले आहे. परस्पर विश्वास आणि चर्चेद्वारे परस्परांविषयी विश्वास वाढवण्यासाठी तसेच स्थिर आणि सक्षम विकासासाठी आवश्यक द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन दिले जाईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लीन जियान यांनी माध्यमांना सांगितले.
पूर्व लडाखमध्ये मे २०२०मध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या कोंडी दरम्यान जून महिन्यात गलवान खोऱ्यात सैनकांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. त्या तणावामुळे व्यापाराव्यतिरिक्त द्विपक्षीयसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.