वॉशिंग्टन – प्राचीन कथांमध्ये नेहमीच उल्लेख होत असलेला पाताळलोक ही केवळ कल्पना नसून असे पाताळ खरोखरच अस्तित्वात असल्याबाबत शंका आता वैज्ञानिकांनाही येऊ लागली आहे. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये केंद्रस्थानी हे पाताळ अस्तित्वात असू शकेल असे वैज्ञानिककानाही वाटू लागले आहे.
भूकंपाच्या काही लहरी गाभ्याला स्पर्श करून परत न येता संपूर्ण आरपार गेल्याने वैज्ञानिकांना आता पृथ्वीच्या केंद्रस्थानी कोठेतरी पाताळ अस्तित्वात आहे असे वाटू लागले आहे. फिजिक्स ऑफ द अर्थ या प्रख्यात नियतकालिकांमध्ये याबाबतचे लेखन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पृथ्वीचा गाभा कठीण आणि कठोर आहे असे मानले जाते.
पृथ्वीच्या अंतर्गत जेव्हा भूकंप होतो तेव्हा या लहरी त्या कठीण गाभ्याला स्पर्श करून परत येतात; पण नुकत्याच झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की काही लहरी स्पर्श करून परत न येता आरपार निघून गेल्या. केंद्र स्थानी असलेला जो भाग असा नरम आहे तो भाग पाताळ लोक असू शकतो असे काही संशोधकांना वाटत आहे.
ब्रिटनमधील ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक जेसिका इर्विंग यांनीही या समजाला पुष्टी दिली आहे. जुल्स वर्न नावाच्या एका लेखकाने 1850 मध्ये पृथ्वीचा गाभा नरम आणि मऊ असल्याबाबत काही लिखाण केले होते. 1950 मध्ये शास्त्रज्ञांनी हा दावा खोडून काढला होता आणि पृथ्वीचे केंद्रस्थान कठोर आणि कठीण आहे, असे म्हटले होते.
पृथ्वीचे केंद्रस्थान अत्यंत गरम आणि प्रचंड दबावाखाली असल्याने त्या प्रदेशात पोहोचणे अशक्य असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे. जरी भूकंपाच्या काही लहरी गाभ्याला स्पर्श करून परत न येता आरपार गेल्या असल्या तरी या विषयावर आणखी काही संशोधन होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.