रेमडेसिविरच्या उत्पादनात दुप्पट वाढ

नवी दिल्ली  – करोना व्हायरसच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर औषधाची गरज पडते. मात्र सध्या भारतामध्ये या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या औषधांचे उत्पादन करणाऱ्या सिप्ला कंपनीने गेल्या आठवड्यापासून या औषधाचे उत्पादन दुप्पट केले आहे.

कंपनीने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागणी वाढल्यामुळे आणि बऱ्याच राज्य आणि केंद्र सरकारने सूचना केल्यानंतर आम्ही या औषधाच्या उत्पादनात वाढ केली आहे.
हे औषध जीलेड सायन्सेस या अमेरिकन कंपनीने विकसित केलेले आहे आणि भारतातील सात कंपन्यांना या औषधाचे उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे. भारतामध्ये प्रत्येक महिन्याला 38.80 लाख इतकी इंजेक्‍शन तयार करण्याची क्षमता आहे.

केंद्र सरकारच्या औषध विभागाने या कंपन्यांना उत्पादन वाढविण्यास सांगितले असून परिस्थितीकडे आमचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही आठवड्यात भारतातील विविध शहरात करोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे औषधी आणि आरोग्यसुविधा यंत्रणावर दबाव आला आहे. मात्र आता केंद्र आणि राज्यांनी समन्वयाने केवळ लसच नाही तर उपचारासाठी आवश्‍यक इतर औषधे आणि ऑक्‍सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी समन्वयाने काम करायचे ठरविले आहे. आगामी काळात याचा सकारात्मक परिणाम जाणवेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.