पुणे – मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागाला शनिवारी असलेली साप्ताहिक सुट्टी आणि रविवारी (स्वातंत्र्य दिन) जोडून सुट्टी आली होती. परिणामी, सोमवारी आणि मंगलवारी मार्केट यार्डात भाजीपाल्याची नेहमीपेक्षा दुप्पट आवक झाली. मात्र, भाव निम्म्याने उतरले होते.
शेतकऱ्यांना आपेक्षित भाव मिळू शकले नाहीत. विशेषत: वांगी, दोडका, गवार, टोमॅटो, भेंडी, काकडी, फ्लॉवर आणि दुधीचे भाव जवळपास निम्म्याने उतरले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आडते असोसिएशनने यापुढे सलग सुट्टी देताना विचार करावा, अशी मागणी मार्केट यार्डातील व्यापारी आणि शेतमाल विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांनी केली.
शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने बाजार आवारात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. शेतमाल गाळ्यावर उतरवण्यासाठी 11 ते 12 वाजेपर्यंत वाट पाहावी लागल्याचे चित्र होते. शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे ग्राहकांच्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. या सगळ्या गोष्टीचा परिणाम माल विक्रीवर झाल्याचे दिसून आले.
भाजी भाव
वांगी 10-12
दोडका 5-6
भेंडी 5 -6
टोमॅटो 4-6
गवार 6-8
काकडी 4 -6
दुधी 6 -8
फ्लॉवर 3-6