लॉकडाऊनला हरताळ ः 10 रुपयांच्या तंबाखू पुडीची 30 रुपयांना विक्री
संगमनेर – लॉकडाऊन असल्याने माल मिळत नसल्याचे कारण देत किराणा दुकानदारांकडून 10 रुपयांची तंबाखू पुडी 30 रुपयांना विकून उखळ पांढरे केले जात आहे. तर बिडी, सिगारेट व बंदी असलेल्या गुटख्याचीही शहरासह ग्रामीण भागातही दुप्पट दराने विक्री करण्यात येत आहे.
करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून अमली पदार्थांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असली, तरी गुटखा, तंबाखू, सिगारेटसारखे पदार्थ सहजगत्या उपलब्ध होत आहे.
त्यामुळे बंदीतही हा माल उपलब्ध कसा होतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला करोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आली असली, तरी तंबाखू, बिडी, सिगारेटच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. असे असले तरी तल्लफ भागवण्यासाठी हा खर्च सहन करण्याची ग्राहकांची तयारी आहे. करोनामुळे तंबाखूजन्य पदार्थांची सर्वाधिक विक्री करणाऱ्या पानपट्टी, पान दुकाने सक्तीने बंद केली आहेत.
तरीही अनेक ठिकाणी किराणा दुकानांमध्ये ठराविक ग्राहकांना वाढीव पैसे देऊन अंमली पदार्थ सहजगत्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लॉकडाऊन व बंदीमुळे तंबाखूजन्य पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येते.वाढीव किमतीला होलसेल दरात तंबाखू, सिगारेट, गुटख्याची पाकिटे घेऊन त्यांची सर्रास चढ्या भावाने विक्री सुरू असून, करोना संसर्गापासून लोकांचे आरोग्य जपण्याचा शासनाच्या उद्देशालाच दुकानदारांकडून हरताळ फासला जात आहे.
राष्ट्रहिताला बाधा आणणाऱ्या अशा विघातक प्रवृत्तींना धडा शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे.
दुकानदारांनी साधली बंदीत संधी
वास्तविक महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून गुटख्याच्या विक्री व उत्पादनासाठी बंदी असली, तरी परराज्यांतून चोरट्या मार्गाने सर्रासपणे गुटखा उपलब्ध होत आहे. किराणा दुकाने, पानटपऱ्यांवर उघडपणे बंदी असणाऱ्या गुटख्याची विक्री सुरू असल्याने तलफ भागवणाऱ्यांना सहजपणे आपला ब्रॅंड उपलब्ध होत आहे. त्यामुळे दुकानदारांनी बंदीत संधी साधली आहे.