शिर्डी : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिर्डीतील साई संस्थानच्या तीन कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (3 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास विमानतळ रोडवर घडली आहे.
सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ अशी हल्ल्यात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर कृष्णा देहरकर हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर शिर्डीत भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या उद्देशाने या घटना घडल्या असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी सकाळी शिर्डीत साई बाबा संस्थेचे दोन कर्मचारी आणि एक तरुण कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चोरीच्या उद्देशाने तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. एवढंच नाही तर त्यांनी निरपराध नागरिकांवर चाकूने सपासप वार केले.
यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या कृष्णा देहरकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील.
मृतांच्या नातेवाईकांचा तीव्र संताप
धक्कादायक बाब म्हणजे, या हल्यात दोघांचा जीव गेल्यानंतरही पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांनी या घटना अपघात असल्याचे सांगितल्याने मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत घोडे याच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी गुन्हेगारांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी किरण सदाफुले या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. राजू माळी हा दुसरा आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी विविध पथक तैनात करुन शोधमोहीम सुरू केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना अपघात आणि खून यातील फरक कळत नाही : सुजय विखे
या घटनेबाबत बोलताना माजी खासदार सुजय विखेपाटील म्हणाले कि, पोलिसांना अपघात आणि खून यातील फरक कळत नाही, त्याला पोलिसात राहण्याचा अधिकार नाही. त्याच्या निलंबनासाठी पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. तसेच पोलीस निरीक्षक यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. शिर्डीची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. येथील पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येईल, असं सुजय विखे म्हणाले.